धुळे शहर व जिल्ह्यात तूर्तास कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या कमी दिसत असली, तरी एप्रिल महिन्यात वेगळे चित्र होते. सर्वत्र कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत होती. त्यांच्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन ऑक्सिजन मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. याच कालावधीत जिल्हाधिकारी यादव यांनी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले होते. या आवाहनास धुळे शहरातील प्रख्यात ‘संजय सोया ग्रुप’चे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, संजय अग्रवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सामाजिक दायित्व निधीतून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जनरेटरसह ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पातून दररोज किमान ६० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाची यंत्रसामग्री काही दिवसांपूर्वीच जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन प्रकल्पाच्या निर्मितीला चालना मिळाली.
बुधवारी विभागीय आयुक्त गमे यांच्या हस्ते जिल्ह्यात सामाजिक दायित्व निधीतून उभ्या राहिलेल्या पहिल्यावहिल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विनी भामरे, संजय सोयाच्या संचालक संतोष अग्रवाल, अनिल अग्रवाल, रवी अग्रवाल, जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी डाॅ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.
या वेळी विभागीय आयुक्त गमे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपुष्टात आलेला नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत धुळे जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यास जिल्हा प्रशासन आणि ‘संजय सोया ग्रुप’ने सकारात्मक प्रतिसाद दिला. हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत निश्चितच उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी यादव म्हणाले, गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली होती. ऑक्सिजनची पूर्तता करताना धावपळ उडाली. मात्र, ऑक्सिजनच्या बाबतीत आपणच स्वयंपूर्ण व्हावे म्हणून विचार पुढे आला. त्यासाठी सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटनांना आवाहन केले होते. त्यास ‘संजय सोया ग्रुप’ने दिलेला प्रतिसाद अतिशय कौतुकास्पद आहे.
माजी आमदार कदमबांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, वसंत अग्रवाल, राजेंद्र अग्रवाल, योगेश अग्रवाल, प्रशील अग्रवाल, कमलेश सिन्हा, हेमंत राठोड, प्रणील पतनपुरे, विनोद अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, संजय गिंदोडिया, दिनेश गिंदोडिया, अनुप गिंदोडिया, मनोज डिसा आदी उपस्थित होते.