ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली; साक्री तालुक्यात केवळ सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 12:28 IST2021-01-03T12:28:08+5:302021-01-03T12:28:24+5:30
धुळे : मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहे. आता अक्टिव्ह रुग्णांची संख्या ...

dhule
धुळे : मागील काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहे. आता अक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या म्हणजेच
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५० पेक्षा तर धुळे शहरातील रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी झाली आहे. सर्वात कमी रुग्ण साक्री तालुक्यात आहेत.
धुळे शहरात सुरुवातीपासून जास्त रुग्ण आढळले आहेत. मागील काही दिवसांत मात्र रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. कधी कमी रुग्ण आढळतात तर कधी रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पेक्षा जास्त होते तसेच पुन्हा कमी होत आहे. आता मात्र ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १३४ इतकी झाली आहे. धुळे शहरातील रुग्णदेखील १०० पेक्षा कमी झाले आहेत. धुळे शहरातील ८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
साक्री तालुक्यात सर्वात कमी रुग्ण
साक्री तालुक्यात सर्वात कमी बाधित रुग्ण आहेत. साक्री येथील सहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यानंतर शिंदखेडा तालुक्यात ९ रुग्ण आहेत. शिरपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या कमीजास्त होत आहे.
सध्या शिरपूर तालुक्यात ९ रुग्ण आहेत. मागील महिन्यात तालुक्यातील बाधितांची संख्या २ इतकी कमी झाली होती. धुळे तालुक्यातील रुग्णांचे प्रमाण प्रथमच कमी झाले आहे. तालुक्यातील २० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
खासगी रुग्णालयात २० रुग्ण -
खासगी रुग्णालयात २० बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७, एसीपीएम महाविद्यालयात ५, तर ७८ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तीन जण दाखल असून, ११ बाधित रुग्णांवर इतर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
१२ रुग्णांना तीव्र लक्षणे -
सध्या उपचार घेत असलेल्या बहुतांश रुग्णांना कोरोनाचे कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र १२ रुग्णांना कोरोनाची तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत आहेत. ४७ रुग्णांना सौम्य तर २६ रुग्णांना माध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. ४९ रूग्णांना कोणतेही लक्षणे नाहीत.