परिसरात रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरे, दादर, भाजीपाला पिके, फळपिके आदी पिकांचे जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसात येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून आता पुन्हा अस्मानी संकटासोबत डुकरांच्या धूमशानमुळे सुलतानी संकटाचा सामना येथील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
डुकरांनी केली अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस
कापडणे येथील श्री महामहेश्वर मंदिर परिसरातील शेती असलेले शेतकरी कैलास रघुनाथ पाटील, महादू उत्तम पाटील, दगाजी रतन पाटील या तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी व गव्हाचे डुकरांनी प्रचंड नुकसान केले.
ज्वारी व गहू पिकांचे डुकरांनी अतोनात नुकसान केलेले आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी येथील नासधूस केलेल्या शेतीपिकांसमोर उभे राहून ,वराह पालन व्यावसायिकांविरोधात घोषणा देत शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले आहे. यापुढे डुकरांचा बंदोबस्त न केल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा गंभीर इशाराही सदर शेतकऱ्यांनी याप्रसंगी दिला आहे. आंदोलन करताना नुकसानग्रस्त शेतकरी महादू उत्तम पाटील, दगाजी रतन पाटील, कैलास रघुनाथ पाटील, यांच्यासह मुंगटीकर भिल, अनिल माळी यांनी झालेल्या नुकसानीची नाराजी व्यक्त करीत तीव्र आंदोलन केले याप्रसंगी नाना माळी, पंकज बोरसे, शुभम बोरसे आदी उपस्थित होते.
नुकसानीचा पंचनामा करा शेतकऱ्यांची मागणी
येथील शेतकऱ्यांच्या शेतातील विविध शेती पिके डुकरे खाऊन नष्ट करीत आहेत. ज्वारी व गहू या झालेल्या पिकांचा नुकसानीचा पंचनामा तलाठी, कोतवाल महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ करावा व नुकसानाची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे.