अतिपावसामुळे कपाशी, पपईचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST2021-09-17T04:42:57+5:302021-09-17T04:42:57+5:30
तालुक्यातील शिंदखेडा, चिमठाणे, दोंडाईचा, खलाने, वर्षी, बेटावद, नरडाना, विरदेल, विखरण व शेवाडे या दहा सर्कलमध्ये कमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती ...

अतिपावसामुळे कपाशी, पपईचे नुकसान
तालुक्यातील शिंदखेडा, चिमठाणे, दोंडाईचा, खलाने, वर्षी, बेटावद, नरडाना, विरदेल, विखरण व शेवाडे या दहा सर्कलमध्ये कमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते इतरसाठी जे भांडवल होते, नव्हते ते सर्व शेतीत टाकले. मात्र, तेथून खर्चही निघणार नसून यासाठी शासनाच्या मदतीसाठी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.
या वर्षी तालुक्यात खरीप पिकांना लहरी पावसाचा फटका बसला आहे. सुरुवातीला जून महिन्यात पाऊस वेळेवर आला म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी केली. नंतर १५ दिवस पाऊसच आला नाही. तोपर्यंत बियाणे वाया गेले. नंतर पेरणी केली तीही वाया गेली. जुलै महिन्यात काहींनी तिबार पेरणी केली. पावसाअभावी बाजरी, मूग व डाळ वर्गीय पिके शंभर टक्के वाया गेली. त्यात कपाशी व इतर पिके कसे तरी तग धरून राहिली. तालुक्यात २२ ऑगस्टपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. अतिपावसामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसामुळे झाडावरच कापसातून नवीन अंकुर फुटत असून शेतात वाफ नसल्याने कापशी पीक पिवळे पडून कोरडे होत आहे. तालुक्यात शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे त्यात लाखोवर खर्च शेतकऱ्यांनी केला आहे. मात्र, अतिपावसाचा फटका या फळ पिकालाही बसला आहे. पपईची मोठमोठी झाडे अतिपावसामुळे जागेवरच नष्ट होत असून जे आहेत ते पिवळे पडत असून अनेक रोगांचे शिकार होत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झालेला आहे.