निम्मा पावसाळा होऊनही धरणे कोरडीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST2021-08-22T04:38:56+5:302021-08-22T04:38:56+5:30

शिरपूर : तालुक्यात निम्मा पावसाळा होऊनही पिकांना पोषक व धरणेदेखील पाण्याने भरलेली नसताना गत आठवड्यापासून तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे ...

The dam is dry despite half the rains | निम्मा पावसाळा होऊनही धरणे कोरडीच

निम्मा पावसाळा होऊनही धरणे कोरडीच

शिरपूर : तालुक्यात निम्मा पावसाळा होऊनही पिकांना पोषक व धरणेदेखील पाण्याने भरलेली नसताना गत आठवड्यापासून तालुक्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे पिके टवटवीत दिसू लागली आहेत़ आतापर्यंत सरासरीच्या ६१ टक्के इतका पाऊस तालुक्यात झाला आहे़ बहुतांश धरणेदेखील अद्याप निम्मीदेखील भरलेली नाहीत़

जून व जुलै या दोन महिन्यांत तालुक्यात केवळ ३२ टक्के पाऊस झाला होता़ जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली़ सुरुवातीच्या नक्षत्रातील दमदार पावसामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ मात्र पुन्हा पावसाने दडी मारली आणि शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या़ त्यानंतर पुन्हा पावसाची कृपादृष्टी झाली़ मात्र त्यानंतर पावसाने दांडी मारल्यामुळे पिके कोमेजू लागली होती़ पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटवू लागली़ शिरपूर तालुक्यातील १ लाख ४ हजार १७३ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी आतापर्यंत ९९ हजार ७५६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे़ ९५़.७५ टक्के खरीप पिकांची लागवड झाली आहे़

ऑगस्ट महिन्याचे निम्मे दिवस होऊनही पाऊस झाला नाही़ दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले़ तशातच १७ रोजी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला, काही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली़ दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीदेखील सलग असे ३ दिवस पाऊस झाला़ त्यामुळे कोमेजलेली पिकेदेखील टवटवीत दिसू लागलीत़ २१ रोजीपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- शिरपूर ३९५ मिमी, थाळनेर- २१४, होळनांथे- २४६, अर्थे- २६५, जवखेडा-२५६, बोराडी- ३७०, सांगवी-२८३ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे़

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करवंद धरणाची पाण्याची उपयुक्त क्षमता १८.२६ दलघमी असताना आतापर्यंत या पावसाळ्यात केवळ ४.८९ दलघमी पाण्याचा साठा म्हणजेच २६.७८ टक्के पाण्याने भरले आहे़ गतवर्षी या धरण परिसरात ७०१ मिमी पाऊस झाला असतांना आतापर्यंत २६५ मिमी पाऊस झाला आहे़

अनेक धरणांची ४९़२७ दलघमी क्षमता असताना १८.३१ म्हणजेच ३७.२६ टक्के पाण्याने भरली आहेत. गतवर्षी या धरण परिसरात ६२५ मिमी पाऊस झाला असतांना यावर्षी आतापर्यंत केवळ १४५ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे़ तसेच तालुक्यातील बहुतांश लघु प्रकल्पातदेखील पाण्याचा ठणठणाट आहे़

दरम्यान, हतूनर धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आल्यामुळे ते पाणी तापी नदीत सोडण्यात येत आहे़ त्यामुळे तापी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़

Web Title: The dam is dry despite half the rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.