दादागिरी, अरेरावी करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांना संतप्त शेतकऱ्यांनी हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:25 IST2021-07-18T04:25:50+5:302021-07-18T04:25:50+5:30
नेर : येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे खचलेला भराव आणि सर्विस रोडच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्ग डागडुजीचे काम बंद ...

दादागिरी, अरेरावी करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांना संतप्त शेतकऱ्यांनी हाकलले
नेर : येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या झालेल्या निकृष्ट कामामुळे खचलेला भराव आणि सर्विस रोडच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महामार्ग डागडुजीचे काम बंद पाडल्याचे वृत्त लोकमतने दिल्याने याची दखल घेऊन शनिवारी एनएचआयच्या सहायक अभियंत्यांनी महामार्गस्थळी भेट दिली. या वेळी ठेकेदाराच्या माणसांनी शेतकऱ्यांनी अरेरावी करीत दादागिरी केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना तेथून हकलवून लावले. त्यामुळे निकृष्ट महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे.
नेर येथून सुरत-नागपूर महामार्ग महाल रायवट आणि महालकाळी या शिवारातून बायपास जात आहे. परंतु महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील पाण्याचा निचरा होण्यासाठी आऊटलेट टाकण्यात आले आहेत. परंतु पाण्याचा निचरा न होता ते तुंबून राहिल्याने मध्येच हा महामार्ग खचला आहे. तसेच दोन्ही बाजूचा भरावही खचला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी या महामार्गाच्या डागडुजीस विरोध करून काम बंद पाडले आहे. याबाबत लोकमतने सविस्तर वृत्त दिल्याने शनिवारी एनएचआयचे सहायक अभियंता निखिल महाले यांनी महामार्गाच्या ठिकाणी भेट दिली. या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच वेळी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे चार ते पाच माणसांनी येऊन शेतकऱ्यांना अरेरावी करीत दादागिरीची भाषा केली. यामुळे उपस्थित शेतकरी अधिकच संतप्त झाले. त्यांनीही आपला पवित्रा बदलत ठेकेदाराच्या माणसांना तेथून हकलून लावले. तर एनएचआयचे सहायक अभियंता निखिल महाले यांनी शेतकऱ्यांची समस्या आणि मागण्या ऐकून घेत वरिष्ठांकडे त्या मांडण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही काम होऊ देणार नाहीत, असा इशाराही या वेळी शेतकऱ्यांनी दिला. या वेळी हिराबाई काळे, विजय भास्करराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, शंकरराव खलाणे, डाॅ. सतीश बोढरे, निंबा खलाणे, योगेश गवळे, पोलीस पाटील विजय देशमुख, विशाल देशमुख, राकेश माळी, काशिनाथ माळी, आबा माळी, सागर देशमुख, सुनील खलाणे, राहुल खलाणे, भटू माळी, काशिनाथ माळी, भटू कोळी, नीलेश माळी आदी शेतकरी उपस्थित होते.
गडकरींकडे मांडणार प्रश्न...
या निकृष्ट महामार्गासंदर्भात शंकरराव खलाणे यांनी थेट खासदार सुभाष भामरे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून महामार्गाच्या ठिकाणी येण्याची विनंती केली. परंतु ते एका कार्यक्रमाला जात असल्याने येऊ शकले नाहीत. परंतु सोमवारी संसदीय अधिवेशनासाठी ते दिल्लीला जात असल्याने तेथेच नागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या महामार्गासंदर्भात चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या मांडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पत्र देऊनही घेतली नाही दखल...
नेर म्हसदी फाट्यावरील बायपास रस्त्यावरील उंची कमी करून तसेच बाजूला सर्विस रोड व विद्युत केंद्राजवळ (भदाणे फाटा) बोगदा आणि खंडलाय शिरधाने चौफुलीवर (भटाई फाटा) येथे डायव्हर्शन रस्ता तयार करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा खलाणे यांनी एनएचआयच्या प्रकल्प संचालकांना १४ जून रोजी पत्र दिले होते. परंतु त्याची कोणतीही दखल या विभागाने घेतली नाही. त्यामुळे ही मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांसह महामार्गावर उतरू, असा इशाराही खलाणे यांनी दिला आहे.
जबरदस्तीने काम केल्यास आत्मदहन...
महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या माणसांनी शेतकऱ्यांची समस्या ऐकून न घेता अरेरावीची आणि दादागिरीची भाषा केली आहे. परंतु आमच्या मागण्या आणि समस्या सुटत नाहीत तोपर्यंत कोणतेही काम होऊ देणार नाही. जर त्यांनी जबरदस्तीने येथे काम करण्याचा प्रयत्न केला तर महामार्गावरच आत्मदहन करू.
- हिराबाई काळे, महिला शेतकरी, नेर