बापरे... केवळ २४ तासात लागला ३० टन ऑक्सिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:32 IST2021-04-05T04:32:17+5:302021-04-05T04:32:17+5:30
धुळे : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. बाधित रुग्णांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...

बापरे... केवळ २४ तासात लागला ३० टन ऑक्सिजन
धुळे : जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. बाधित रुग्णांमध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. येथील कोविड रुग्णालय असलेल्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मागील २४ तासात तब्बल ३० टन ऑक्सिजन लागला आहे. या कालावधीत तीनदा ऑक्सिजन टँकचे पुनर्भरण करण्यात आले.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते त्या रुग्णांना याठिकाणी दाखल करण्यात येते. हिरे महाविद्यालयात ३५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर उर्वरित ३०५ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
२४ तासात तीनदा आला टँकर -
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात १३ हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन टँक पुनर्भरणाचा कंत्राट पुणे येथील कंपनीला देण्यात आला आहे. तेथून टँकरने लिक्विड ऑक्सिजन आणला जातो व टँकचे पुनर्भरण करण्यात येते. ऑक्सिजनची गरज वाढल्याने मागील २४ तासांच्या कालावधीत तीनदा टँकर मागवावा लागला आहे. रविवारी रात्री ९ वाजता आलेल्या टँकरमधून १२ टन ऑक्सिजनचे पुनर्भरण टँकमध्ये करण्यात आले. रात्रीतून १२ टन ऑक्सिजन संपला होता. त्यामुळे पुन्हा सकाळी ९ वाजता ६ टन ऑक्सिजनची क्षमता असलेला टँकर महाविद्यालय परिसरात दाखल झाला होता. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता आलेल्या टँकरमधून पुन्हा १२ टन ऑक्सिजनचे पुनर्भरण करण्यात आले. केवळ २४ तासात तब्बल ३० टन ऑक्सिजन लागल्याने कोरोनाची तीव्रता पहिल्या लाटेपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी १५ दिवसात व्हायचे टँकचे पुनर्भरण -
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात १३ हजार लिटर इतकी क्षमता असलेला ऑक्सिजन टँक उभारण्यात आला आहे. वडोदरा येथील कंपनीकडून टँक मागवण्यात आला असून पुनर्भरणाचे कंत्राट पुणे येथील कंपनीला देण्यात आले आहे. पुणे येथून दररोज ऑक्सिजन टँकरच्या साहाय्याने लिक्विड ऑक्सिजन आणून टँकचे पुनर्भरण करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने १५ दिवसातून एकदा टँकचे पुनर्भरण करावे लागत होते.
एका मिनिटात लागतो १० लिटर ऑक्सिजन -
ऑक्सिजनची गरज भासत असलेल्या रुग्णाला एक मिनिटात १० लिटर ऑक्सिजन लागतो. तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला एक मिनिटात ४५ लिटर ऑक्सिजन लागत असल्याचे डॉ. दीपक शेजवळ यांनी सांगितले.
प्रतिक्रिया -
तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची गरज पूर्वीपेक्षा अधिक भासत आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत तर तीनदा ऑक्सिजन टँकचे पुनर्भरण करण्यात आले आहे. यापुढील काळात अजून जास्त प्रमाणात ऑक्सिजन लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे.
- डॉ. दीपक शेजवळ, कोरोना नोडल अधिकारी हिरे महाविद्यालय