शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे; घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST2021-09-17T04:43:01+5:302021-09-17T04:43:01+5:30
या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का जयहिंद काॅलेज रोड शाळा, काॅलेजेस, खासगी शिकवण्यांची सर्वाधिक संख्या असल्याने जयहिंद काॅलेज, ...

शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे; घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती
या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का
जयहिंद काॅलेज रोड
शाळा, काॅलेजेस, खासगी शिकवण्यांची सर्वाधिक संख्या असल्याने जयहिंद काॅलेज, जयहिंद शाळेच्या रस्त्यावर मुलींची वर्दळ असते. देवपुरातील या भागात चाैकाचाैकात रोडरोमिओंचे कट्टे आहेत. कोरोनाच्या आधी दामिनी पथकाची नियमित गस्त असल्याने बऱ्यापैकी आळा बसला होता; परंतु आता रोडरोमिओंना कुणाचाही धाक उरलेला नाही.
कोणी छेड काढत असेल तर येथे संपर्क करा
छेडछाड तसेच महिलांसंबंधी तक्रारींसाठी १०९१ टोल फ्री क्रमांक आहे. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर देखील काॅल करता येतो. याशिवाय संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनला फोन केला तरी त्वरित मदत मिळते, असा दावा पोलिसांनी केला आहे.
छेड काढणाऱ्या अनेकांना कट्ट्यावरच चोपले
कोरोनाच्या आधी दामिनी पथकाचे काम जोरात होते. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात नियमित गस्त होती. रोडरोमिओंना त्यांच्याच कट्ट्यावर चोप दिला जात होता. अनुचित प्रकार घडणाऱ्या ठिकाणांवरही छापा मारून कारवाई केली होती. अनेकांच्या मुसक्याही आवळल्या होत्या. नंतर त्यांना समज देऊन सोडूनही दिले होते. त्यामुळे वचक निर्माण झाला होता.
दामिनी पथक काय करते
मुली आणि महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी शहरातील ठिकठिकाणी गस्त घालून रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचे महत्त्वाचे काम दामिनी पथकाकडे आहे. तसेच आलेल्या तक्रारींवर चाैकशी करून पुढील कार्यवाही केली जाते; परंतु कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून पोलिसांनी दामिनी पथकाचे काम बंद केले आहे. ते आता सुरू करण्याची गरज आहे.
पुन्हा कारवाई होणार
कोरोनामुळे शाळा, काॅलेजेस बंद असल्याने दामिनी पथकाचे काम बंद केले होते; परंतु इतर शहरांमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे दामिनी पथक स्थापन करून पुन्हा कठोर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच दामिनी पथक सक्रिय होईल. रोडरोमिओंना वठणीवर आणू. - चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक