पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:25 IST2021-07-10T04:25:07+5:302021-07-10T04:25:07+5:30
त्यातही उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची ...

पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट
त्यातही उशिरा पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे.
मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली होती. वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरणी, लागवड करण्यास घाई केली. बियाणे बऱ्यापैकी उगवले असताना अचानक पडलेला पावसाचा खंड हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.
हवामानाचा बदल शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणारा आहे. आधीच महागडे बियाणे विकत घेऊन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी पिके संकटात सापडली आहेत. नेर परिसरात कापूस, बाजरी, सोयाबीन, मका, तूर आदी मुख्य पिके घेतली जातात. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनचे आगमन होणार, असे भाकित हवामान विभागाने वर्तवले होते. या अंदाजावर विश्वास ठेवत शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केली. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, त्यांनी आता पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आहे; मात्र ज्या शेतकऱ्यांकडे अशी सोय नाही, अशा कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे चातकासारख्या लागल्या आहेत. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस न आल्यास कोरडवाहू शेतातील पिके करपून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.