मातीमोल भावाने कपाशीची केली जातेय मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:42 IST2021-09-24T04:42:08+5:302021-09-24T04:42:08+5:30
तालुक्यातील एका गावात मण दोन मण कापूस ९ हजार ५१ रुपयांनी खरेदी करुन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली. मुहूर्ताच्या ...

मातीमोल भावाने कपाशीची केली जातेय मागणी
तालुक्यातील एका गावात मण दोन मण कापूस ९ हजार ५१ रुपयांनी खरेदी करुन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच केली. मुहूर्ताच्या नावावर एवढा भाव फोडल्यानंतर किमान आपला कापूस सात हजार रुपये क्विंटल तरी जाईल अशी येथील शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ती आशा फोल ठरली. मालपूर ता. शिंदखेडा येथे घाऊक व्यापारी हे सध्या चार साडेचार हजार रुपये या कापसाला किंमत देत आहे. तर उत्तम प्रतीच्या कापसाला पाच हजार रुपये क्विंटल दर दिला जात आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून किमान सात हजार रुपये कापसाला दर मिळावा, अशी मागणी केली आहे. कारण उत्पन्नात प्रचंड घट झाली असून सर्वच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. यामुळे समतोल तरी साधला जाईल व लावलेले भागभांडवल निघेल.
मालपूर येथे नऊ लहान मोठे कापूस खरेदी करणारे व्यापारी असून दरवर्षी मुहूर्ताच्या दिवशी दिवसभर जो भाव ठरवला जात होता, तो भाव हे व्यापारी देत होते. मात्र या वर्षी या परंपरेला फाटा दिला गेल्याने येथील शेतकऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यामुळे ओला कापूस सुकवून साठवून ठेवून चांगला भाव मिळेल, या प्रतीक्षेत येथील शेतकरी आहे. किमान सात हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी केली आहे.
चौकट..... खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा वजनकाटा सदोष आहे की नाही, तो पासिंग केलेला आहे का तसेच पासिंग केलेला वजनकाटाच वापरला जात आहे की नाही यावर शासन प्रशासनाने नजर ठेवावी. तसेच वेळोवेळी तपासणी करावी. मालपूरसह संपूर्ण ग्रामीण भागात गावोगावी कापसाची खरेदी विक्री ही गावातच होत असते. यामुळे वजनात शेतकरी नाडला जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याकडे या विभागाने लक्ष घालावे.
फोटो :- मालपूर तालुका शिंदखेडा येथे वाळत टाकलेला कापूस.