मनपाच्या त्या कोरोना योध्दांवरच भ्रष्टाचाराचा ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:55+5:302021-04-02T04:37:55+5:30
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गुरूवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती संजय जाधव, सहायक आयुक्त शिल्पा नाईक, ...

मनपाच्या त्या कोरोना योध्दांवरच भ्रष्टाचाराचा ठपका
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात गुरूवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती संजय जाधव, सहायक आयुक्त शिल्पा नाईक, नगरसचिव मनोज वाघ आदीसह सदस्य उपस्थित होते. स्थायी समितीच्या सभेत सहा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी एकही विषय धुळेकरांच्या हितासाठी किंवा काेरोना काळातील उपाय योजना संदर्भात नसल्याने नगरसेवक शितल नवले यांनी आक्षेप घेत म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट झाेन तयार करण्यात आले होते. त्यासाठी मनपाने स्थानिक वृतपत्रात जाहिरात न प्रसिध्द करता परस्पर मनपाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक फायद्यासाठी धनलक्ष्मी ठेकेदारास ठेका दिला होतो. सदरील ठेकेदाराने शहरातील ४०० कंटेनमेंट झाेनसाठी तब्बल ९५ लाखांचे भाडे मनपाकडून मागितले आहे. वास्तविक बहुसंख्य रस्ते १२ मीटरचे असताना सरसकट ४० मीटरचे रस्ते दाखवून तर अव्वाच्या सव्वा बिल काढले जात आहे. शहरातील काही गल्ल्यामध्ये चारचाकी गाडी देखील जाऊ शकत नाही. अशाही गल्ल्या ४० मीटरच्या दाखविण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात भाजपा एकमेव पक्ष होता की, जो रस्त्यावर उतरून कोरोना बाधितांची मदत करत होता. जिल्हाध्यक्ष, महापाेैर यांच्यासह सर्वच पदाधिकारी अन्नदान करण्याचे काम करीत असतांना मनपाचे अधिकारी पैसे कमविण्यामागे लागले होते. असा ही आरोप शितल नवले यांनी सभेत केला.
यावेळी खुलासा देताना उपायुक्त शांताराम गोसावी म्हणाले की, काेरोना काळात शासनाकडून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी शहरातील मंडपदारांची बैठक मनपात घेण्यात आली. याेग्य दर असल्याने तसा निर्णय घेण्यात आला. कोरोना काळ किती दिवसांसाठी असेल किंवा नाही. याबाबत माहिती नसल्याने मनपाला बांबू विकत घ्यावे, किंवा नाही याबाबत निर्णय घेता आला नाही. वाढीव बिलासंदर्भात सदस्यांचा आक्षेप असेल तर सभापतींना अधिकार असल्याने त्यांनी तसा निर्णय घेऊ शकतात. असेही गाेसावी यांनी सांगितले.
कोरोनासाठी औषधी नाही.
मनपाकडे पुरेसा बेड तसेच वैद्यकीय पथक असतांना केवळ बाधितांवर उपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध नसल्याने रूग्णांची गैरसाेय होते. गैरसाेय टाळण्याठी उपाय याेजना करण्याची मागणी अमिन पटेल यांनी केली.
घंटागाडी, पाणीटंचाईसह असच्छतेवर सदस्य नाराज
प्रभागात नियमित घंटागाडी येत नाही. तर महिनाभरात केवळ ३ वेळा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या रोषाला नगरसेवकांना सामाेरे जावे लागते असल्याची तक्रार नगरसेवक अमोल मासुळे, भारती माळी, किरण कुलेवार,कमलेश देवरे, हिना पठाण आदींनी केली.