भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 22:31 IST2021-04-06T22:31:10+5:302021-04-06T22:31:40+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर कर्मचारी गजाआड
धुळे : शेती मोजणीसाठी शेतकऱ्याकडून एक हजार रूपयाची लाच घेतांना भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले. सुनील वसंत धमाणे (५३) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.
धुळे तालुक्यातील चिंचवार येथील एका शेतकऱ्याला स्वत:च्या मालकीची शेतीची हद्द कायम मोजणी करायची होती. त्याने भूमी अभिलेख कार्यालयातील अधीक्षकांकडे अर्ज केला होता. या जमिनीची मोजणी कामी शासकीय फीचे चलन काढून देण्याच्या मोबदल्यात सुनील धामणे या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्याने तक्रारदार शेतकऱ्याकडे १ हजार रुपये लाचेची मागणी केली. शेतकऱ्याने याबाबत धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मंगळवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या भूमी अभिलेख कार्यालय (ग्रामीण) येथे सापळा लावला. मुख्यालय सहायक सुनील वसंत धामणे (५३, रा. प्लॉट नंबर १, एकविरा पार्क, आकाशवाणी केंद्रामागे, देवपूर) याला १ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, पोलीस कर्मचारी जयंत साळवे, शरद काटके, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदिप कदम, भूषण शेटे, महेश मोरे, गायत्री पाटील, सुधीर मोरे यांनी केली.