निजामपूर : साक्री तालुक्यात निजामपूरची प्रतिपंढरी म्हणून सर्वत्र ख्याती आहे़ दरवर्षी येथील आषाढी उत्सवात दूर दूरहून भाविक मोठ्या संख्येत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. यंदा कोरोना संकट आले असल्याने उत्सव स्थगित करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे़निजामपूर येथे सन १८०४ पासून आषाढी उत्सव अव्याहतपणे होत आहे. पण यंदाच्या २१६ व्या वर्षी मात्र हा उत्सव सार्वजनिक होऊ शकणार नाही़ परिसरात हा भक्तमय सोहळा होणार नसल्याची हळ हळ मनात जाणवते आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेले पंढरीचा राणा पांडुरंग आषाढी एकादशीस मध्यान्ही निजामपूर येथे अवतरतात अशी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिरात मध्यान्ही खूप गर्दी होते. टाळ मृदुंगाच्या तालात भक्ती भजनांनी, विठ्ठल नाम गजराने परिसर दुमदुमतो. पांडुरंगाचे लोभस मुखडे डोळ्यात भरण्यासाठी भाविक गर्दी करतात. त्यानंतर दुपारी ३ वाजता विठ्ठल, रखुमाईच्या मुर्तींची मोठ्या लाकडी रथातून गावातून मिरवणूक निघते. मोठ्या संख्येत तरुणाई रथ खेचण्यास सरसावलेली असते. गावाला भक्तिमय यात्रेचे स्वरूप आलेले असते. उत्सव काळात पूर्वी हभप मुरलीधर महाराज, लक्ष्मण महाराज, राजेश्वर महाराज आणि त्यानंतरच्या काळात शाम महाराज यांचे एकादशीस कीर्तन होत असे. त्यानंतर द्वारकानाथ महाराज, राया महाराज, राजू महाराज यांची रसाळ भाषेतील कीर्तने, प्रवचने श्रोत्यांसाठी पर्वणीच असायची. ती देखील यंदा होऊ शकणार नाहीत. रथ यात्रा सुद्धा स्थगित राहणार असल्याचे निजामपूर पोलीसांना कळविण्यात आल्याचे हभप राजेंद्र उपासनी यांनी सांगितले़
कोरोनामुळे यंदा आषाढीचा उत्सव केला स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:18 IST