कोरोना सुसाट... तरीही नागरिक बिनधास्त...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:24+5:302021-05-14T04:35:24+5:30
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी अक्षयतृतीया हा सण खान्देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी पितरांची घागर भरली जाते़ ...

कोरोना सुसाट... तरीही नागरिक बिनधास्त...
खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
अक्षयतृतीया हा सण खान्देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी पितरांची घागर भरली जाते़ आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आजही कायम आहे़ अक्षयतृतीयेच्या दिवसाचा मुहूर्त साधून अनेक शुभ कार्येदेखील केली जातात़ कोरोनामुळे धुळ्यात लॉकडाऊन सुरू आहे़ असे असले तरी अक्षयतृतीयेमुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले़ अक्षयतृतीयेप्रमाणे मुस्लीम धर्मीयांची रमजान ईदसुद्धा शुक्रवारी साजरी केली जाणार आहे़ त्यामुळे कपडे, बूट, चपला, खाद्य पदार्थ, चीज वस्तू खरेदीसाठीसुद्धा मुस्लीम बांधवही दाखल झाले होते़ परिणामी बाजारात गर्दीचे प्रमाण वाढले आहे़
परिसर गजबजलेलाच
गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून शहरातील आग्रा रोड, पाचकंदील, चैनी रोड, जे़ बी. रोड, पारोळा रोड, फुलवाला चौक, दत्त मंदिर परिसर या ठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती़ भाजीपाला, फळविक्रेत्यांच्या गाड्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीच्या कोंडीत भर पडल्याचे दिसून आले़
इतरही दुकाने सुरूच
कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन सुुरू असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे़ मात्र त्यानंतरही अनेक इतर व्यावसायिकांनी दुकाने सकाळच्या सत्रात खुली केली असल्याचे आढळून येत आहे़ बाजारात सर्वच प्रकारची दुकाने सुरू असल्याने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे़
लॉकडाऊनचा फायदाच काय?
कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आलेला आहे़ यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही़ त्यांच्यावर निर्बंध लावत सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होत आहे़ पण, अपेक्षित प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे़ संचारबंदी लावल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काटेकाेरपणे अंमलबजावणी करण्यात आली खरी, पण सद्य:स्थितीत त्याच्यात शिथिलता आलेली दिसत आहे़
बॅरिकेड्स लावलेले
कोरोना असूनही शहरात फिरणाऱ्यांची संख्या काही करूनही कमी होताना दिसून येत नाही़ त्यांना रोखण्यासाठी सध्या पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचा अॅक्शन प्लॅन नसल्याची वस्तुस्थिती आहे़ तरीदेखील विनाकारण फिरणाऱ्यांना रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे़ त्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले असून त्या माध्यमातून वर्दळ थांबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे होत असलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे़
आंब्याचा दर ८० रुपयांपर्यंत
अक्षयतृतीया सणात आंबा या फळाला विशेष असे महत्त्व आहे़ पितरांची पूजा करताना आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा असल्याने आंबा खरेदीलासुद्धा नागरिकांनी पसंती दर्शविली़ बदामसह लंगडा, केशरी असे विविध प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते़ सरासरी ८० रुपये दराने त्यांची विक्री होत होती़ जास्त किलो आंबे घेतल्यास ६० ते ७० रुपये दरानेसुद्धा आंब्याची विक्री होताना दिसून आली़ पाचकंदील आणि आग्रा रोडवर आंबे विक्रीच्या लोटगाड्या मोठ्या प्रमाणावर होत्या़
घागरची किंमत ७० रुपये
आंब्यापाठोपाठ घागरीलादेखील अक्षयतृतीयेच्या पूजेत मानाचे स्थान दिलेले आहे़ पितरांची पूजा करीत असताना गहू ठेवून त्यात पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते़ त्यात मातीचेच लहान आकाराचे भांडे ठेवले जाते़ या भांड्यावर डांगर ठेवून त्याचीही पूजा केली जाते़ अक्षयतृतीयेमुळे मातीच्या घागरींना मागणी दिसून आली़ साधारण त्याची किंमत गुरुवारी ६० ते ७० रुपयांपर्यंत होती़ पूजेला महत्त्व असल्यामुळे नागरिकांनीदेखील घागरीची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली़ घागरीदेखील वर्दळीच्या चौकांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत्या़