कोविडच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉस्पिटलमधून कोविडच्या रुग्णांकरिता वापरण्यात येत असलेल्या बॉयोमेडिकल वेस्ट कचरा गोळा करणाऱ्या संस्थेच्या कार्यप्रणाली व त्यांनी आकारणी केलेल्या दराबाबत आयएमए संस्थेमार्फत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या़ त्यानुसार शहरात याबाबत या व्यवस्थेत अडचणी येऊ नयेत व कामकाजात खंड पडू नये यासाठी आयएमएचे पदाधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची आयुक्त अजिज शेख यांनी त्यांच्या दालनात बैठक घेतली़ यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी सौजन्या पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ़ महेश मोरे, आयएमएच्या धुळ्याच्या अध्यक्षा डॉ़ जया दिघे, सचिव डॉ़ महेश अहिरराव, डॉ़ जितेंद्र लहामगे, डॉ़ अनिल जाखेटे, डॉ़ आशिष पाटील, डॉ़ बिरारी, सहायक आयुक्त विनायक कोते, स्वामी समर्थ बॉयोमेडिकल वेस्ट संस्थेच्या प्रतिनिधी माया पवार आदी उपस्थित होते़
शहरात असलेल्या विविध हॉस्पिटलमधून जमा होणारा वैद्यकीय कचरा संकलन व विल्हेवाट करण्यासाठी महापालिकेमार्फत ठेकेदार नियुक्त करण्यात आलेला आहे़ तथापि, सद्य:स्थितीत कोविडची परिस्थिती असल्याने त्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय साहित्य व वस्तूंची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या संस्थेला स्वतंत्रपणे देण्यात आलेली आहे़ या संस्थेमार्फत यासाठी आकारण्यात येणारे दर अवाजवी असल्याने ते कमी करण्याबाबत आयएमए संस्थेने धुळे महापालिकेकडे विनंती केली होती़ त्या अनुषंगाने याबाबत शहरात या यंत्रणेत अडचणी निर्माण होऊ नयेत व वेळेत व शासन निर्देशानुसार, या कचऱ्याची विल्हेवाट तत्काळ लागावी यासाठी आयएमए संस्थेचे पदाधिकारी आणि श्री स्वामी समर्थ बॉयोमेडिकल वेस्टचे ठेकेदार यांची समन्वय बैठक आयुक्त अजिज शेख यांच्या दालनात पार पडली़
(चौकटसाठी )
या बैठकीत संबंधितांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली़ यामध्ये संबंधित नियुक्त संस्थेने याबाबत येणाऱ्या खर्चाचे सविस्तर विवरण व तपशील सादर करावा़ त्यानुसार, कोविडसाठी येणाऱ्या वाढीव खर्चाच्या प्रमाणात संबंधित हॉस्पिटलकडून आकारणी करावी, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला़ त्याप्रमाणे संबंधितांना आदेशित करण्यात आले़ याबाबत लवकरच पुनश्च समन्वय बैठक घेऊन त्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे़