भूषण चिंचोरे
धुळे : गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सर्वत्र तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू असतानाच सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने धडधड वाढली होती.
मे महिन्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली होती. त्यानंतर सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शून्यापर्यंत कमी झाली होती. आतापर्यंत दोनवेळेस जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. मात्र सप्टेंबर महिन्यात ७, १० व १५ रोजी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली होती. जिल्ह्यात तिसरी लाट तर येणार नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून दैनंदिन बाधितांची संख्या शून्यावर आली आहे, पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात आढळले तीन रुग्ण -
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यात धुळे शहरातील दोन, तर धुळे तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश होता. व्यवसायानिमित्ताने परराज्यात गेलेल्या शहरातील ऊसगल्ली येथील तरुणाच्या कोरोना चाचणीचा अहवाल ७ रोजी पॉझिटिव्ह आला होता. धुळे तालुक्यातील शिरुड येथील व्यक्तीचा १०, तर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे १५ सप्टेंबर रोजी स्पष्ट झाले होते.
ऑगस्टमध्ये आढळले सात रुग्ण -
मे महिन्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली होती, पण कोरोनाचे रुग्ण आढळणे पूर्णपणे थांबलेले नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यात, धुळे शहरातील पाच रुग्णांचा समावेश होता. तसेच साक्री तालुक्यातील कसाने व धुळे तालुक्यातील मोराने येथील एका व्यक्तीचा समावेश होता. धुळे शहर कोरोनामुक्त होणारे राज्यातील पहिले शहर ठरले होते. पण त्यानंतर शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अधिक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत म्हणून नागरिकांनी नियम मोडू नये. कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळणे आवश्यक आहे.
डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
ग्राफसाठी
जिल्ह्यातील शेवटचे दहा कोरोनाबाधित रुग्ण -
१५ सप्टेंबर - खासगी रुग्णालय, धुळे
१० सप्टेंबर - शिरुड, ता. धुळे
७ सप्टेंबर - ऊसगल्ली, धुळे
२० ऑगस्ट - धुळे शहर (तीन रुग्ण)
१२ ऑगस्ट - ग्रीन पार्क, धुळे
११ ऑगस्ट - मोराने, ता. धुळे व मांजरोद, ता. शिरपूर
१ ऑगस्ट - कसाने, ता. साक्री