कोरोना थांबेना, रुग्ण आढळणे सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 12:29 IST2021-01-01T12:29:29+5:302021-01-01T12:29:44+5:30
भुषण चिंचोरे धुळे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली ...

कोरोना थांबेना, रुग्ण आढळणे सुरुच
भुषण चिंचोरे
धुळे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सप्टेंबरनंतर रुग्णांचे प्रमाण कमी झाले होते. जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याची चर्चा त्यावेळी सुरू झाली होती. मात्र आता पुन्हा रुग्णांचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. दररोज सरासरी २० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. मागील मंगळवारी तर एकाच दिवशी ४४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी होईल असे वाटत होते. मात्र पुन्हा गुरुवारी २० रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा दोनशे पार जाण्याची चिन्हे आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या म्हणजेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५० पार गेली आहे. मागील दोन महिन्यांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली होती, मात्र आता पुन्हा त्यात वाढ झाली आहे. धुळे शहरात जास्त रुग्ण आहेत, तर साक्री तालुक्यात उपचार घेत असलेले सर्वांत कमी कोरोनाचे रुग्ण आहेत.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६३ इतकी झाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी रुग्णांची संख्या १८४ इतकी होती. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा विस्फोट झाला होता. त्यावेळी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १५०० पेक्षा अधिक झाली होती. मात्र त्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २०० पेक्षा कमी झाली होती. दरम्यान, धुळे शहरातील रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६६ टक्के रुग्ण धुळे शहरातील आहेत. धुळे शहरात सुरुवातीपासूनच उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या जास्त राहिली आहे. जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या १६३ रुग्णांपैकी १०९ सक्रिय रुग्ण हे धुळे शहरातील आहेत. सर्व तालुक्यातील रुग्णांची संख्या मात्र ५०पेक्षा कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. साक्री तालुक्यात सर्वांत कमी रुग्ण आहेत. धुळे तालुक्यात २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुक्यातील १२, शिंदखेडा १० व साक्री तालुक्यातील ६ जण उपचार घेत आहेत. शिरपूर तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली होती. तेथील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या केवळ दोन इतकी झाली होती. मात्र पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे तालुक्यात सध्या १२ रुग्ण आहेत.