पर्यावरणप्रेमी शिक्षकाचे वाढदिवसाच्या दिवशीच कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:39+5:302021-05-14T04:35:39+5:30
धुळे : शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे महान कार्य करतानाच वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या वडिलांचे निधन झाले ...

पर्यावरणप्रेमी शिक्षकाचे वाढदिवसाच्या दिवशीच कोरोनाने निधन
धुळे : शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे महान कार्य करतानाच वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या वडिलांचे निधन झाले म्हणून मुलाने त्यांच्या दशक्रियाविधीच्या दिवशी वृक्षारोपण करीत तसेच मित्रपरिवार आणि नातेवाइकांना रोपांचे वाटप करीत आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली असून, समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
बोरचक, ता. नवापूर येथील जीवन विकास माध्यमिक शाळेत कार्यरत कला शिक्षक राजू बळीराम पाटील यांचे २ मे रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरत येथे रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. राजू पाटील यांना सामाजिक कार्याची व उपक्रमाची आवड होती. वृक्षारोपण आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे होते. त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प त्यांचे सुपुत्र दिग्विजय ठाकरे आणि कुटुंबाने केला आहे.
आजची परिस्थिती पाहता दवाखान्यात प्राणवायूची कमतरता दिसून येत आहे. अशाच परिस्थितीत दिग्विजयच्या वडिलांचे निधन झाले. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच आजही आपले वडील कुठल्या ना कुठल्या रूपात जिवंत राहावेत या उद्देशाने त्यांच्या कुटुंबाने दशक्रियाविधीच्या दिवशी निंबाचे व वडाचे रोप लावून दिवंगत शिक्षक राजू पाटील यांना पर्यावरणपूरक श्रद्धांजली अर्पण केली. एवढेच नव्हे तर दुःखात सांत्वन करायला आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराला रोपे भेट देऊन वृक्षारोपण करण्याचे आणि ते जगविण्याचे आवाहन करण्यात आले.
दिग्विजयचे वडील ५३ वर्षे आयुष्य जगले. दु:खाचा हा धागा पकडत या कुटुंबाने ५३ रोपांचे वाटप केले. या प्रत्येक झाडात आमचे वडील जिवंत असतील, जेव्हा जेव्हा आम्ही या झाडांच्या सावलीत उभे राहू तेव्हा तेव्हा आम्हाला आमच्या वडिलांच्या मायेच्या सावलीचा सहवास मिळेल, अशा दु:खद पण आदर्श भावना या
कुटुंबाने व्यक्त केल्या आहेत. म्हणून दिलेले प्रत्येक रोप जिवंत राहावे, त्याला जगवावे अशी विनंती दिग्विजय ठाकरे याने सर्व नातेवाईक व मित्रपरिवाराला केली.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे मंगळवारी दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नंदुरबार येथे सायंकाळी वृक्षारोपण आणि वृक्षरोपे वाटप करीत पर्यावरपूरक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मूळगाव साक्री तालुक्यातील टिटाणे
दिवंगत शिक्षक राजू पाटील यांचे मुळे गाव टिटाणे, ता. साक्री आहे. परंतु नोकरीनिमित्त त्यांचे कुटुंब नंदुरबारला स्थलांतरित झाले. आपल्या शाळेसह परिसरातील इतरही शाळांमध्ये ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेऊन पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून द्यायचे. नंदुरबार येथे कोकणी हील परिसरात मंजुळा विहारमध्ये त्यांचे घर आहे. काॅलनी परिसरातील मोकळ्या भूखंडामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन असंख्य झाडे जगवली आहे. काॅलनी परिसरात सर्वत्र निंबाच्या झाडांची सावली आहे.