कोरोनामुळे खेळाडूंच्या कौशल्य विकासावर परिणाम; क्रीडा प्रशिक्षण शिबिर दुसऱ्या वर्षीही झाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:25 IST2021-06-03T04:25:54+5:302021-06-03T04:25:54+5:30
विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर दरवर्षी जिल्हा क्रीडा विभागासह विविध क्रीडा संघटना, अकॅडमी, क्लबच्या माध्यमातून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे होतात. या ...

कोरोनामुळे खेळाडूंच्या कौशल्य विकासावर परिणाम; क्रीडा प्रशिक्षण शिबिर दुसऱ्या वर्षीही झाले नाही
विद्यार्थ्यांच्या परीक्षा आटोपल्यानंतर दरवर्षी जिल्हा क्रीडा विभागासह विविध क्रीडा संघटना, अकॅडमी, क्लबच्या माध्यमातून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे होतात. या शिबिरांमध्ये खेळाडूंच्या शारीरिक क्षमता वाढीसह कौशल्यवाढीसाठी प्रयत्न केले जातात. प्रशिक्षण शिबिरांमुळे खेळाडूंची कामगिरी उंचावते. मात्र, कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी उन्हाळी क्रीडा शिबिरे झाली नाहीत, तसेच वर्षभर क्रीडा स्पर्धाही झाल्या नाहीत. या वर्षीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे यंदाही खेळाडूंना शिबिरांना मुकावे लागले. उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमुळे सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात खेळाडू अधिकाधिक वेळ देऊ शकतात. त्यामुळे अशा शिबिरांना महत्त्व आहे. जिल्ह्यात विविध खेळांच्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविला आहे. त्यात प्रामुख्याने ॲथलेटिक्स, नेटबॉल, शूटिंग बाॅल, बास्केटबॉल, बाॅक्सिंग, कुस्ती, खो-खो, कबड्डी यांसह अनेक खेळांचा समावेश आहे.
जिल्ह्याच्या क्रीडा विभागात खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट खेळाचे मिळून दोन प्रशिक्षक आहेत. जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत या तीन खेळांसोबतच अनेक खेळांचे दरवर्षी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर होते. मात्र, कोरोनामुळे यंदा या शिबिरावर बंधने आली. त्यामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे.
क्रीडा शिबिरांमध्ये शारीरिक, मानसिक, बाैद्धिक क्षमता वाढीस लागते. तसेच एकाग्रता, शिस्त व संघभावना हे गुण विकसित होतात. शिबिरातून पायाभरणीचे काम होते; परंतु शिबिरे होत नसल्याने कौशल्य विकासावर परिणाम झाला आहे.
- हेमंत भदाणे, क्रीडाशिक्षक
कठोर निर्बंधांमुळे घरीच व्यायाम सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात प्रशिक्षण शिबिरे होतात. मात्र, कोरोनामुळे मैदाने बंद असल्याने अडचण निर्माण झाली आहे. कौशल्य विकास, आत्मविश्वास वाढीसाठी ही शिबिरे उपयुक्त ठरतात.
-महेंद्र गावडे, राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू
कोरोनाच्या संसर्गामुळे उन्हाळी क्रीडा शिबिरे होऊ शकली नाहीत. क्रीडाशिक्षक, प्रशिक्षकांचे ऑनलाईन वेबिनार घेतले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची आणि शासनाच्या निर्देशांची वाट पाहत आहोत.
- सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी, धुळे