धुळे महापालिकेच्या महासभेत भूसंपादनाचा वादग्रस्त विषय अखेर तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 21:11 IST2020-12-30T21:11:06+5:302020-12-30T21:11:26+5:30
अजेंड्यावरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक, आॅनलाईन महासभेतील वास्तव, नगरसेवकांनी मांडल्या समस्या

धुळे महापालिकेच्या महासभेत भूसंपादनाचा वादग्रस्त विषय अखेर तहकूब
धुळे : शहरातील सर्व्हे नंबर ४८३ मधील शंभर फुटी रस्त्याच्या विकास योजनेत भूसंपादन करण्याविषयी महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला विषय अखेर तहकूब करण्यात आला. स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी यापुर्वीच महापौर आणि आयुक्तांना पत्र देवून हा विषय मंजूर करु नये अशी मागणी केली होती. महासभेत सभापती बैसाणे यांच्या गैरहजेरीत नगरसेवक शितल नवले यांनी प्रशासनाला धारेवर धरत वादग्रस्त आणि न्यायप्रविष्ट विषय सादर करुन आम्हाला अडचणीत आणू नये असे सांगत आक्षेप नोंदविला. अखेर महापौर चंद्रकांत सोनार यांनी हा विषय तहकूब केला. दरम्यान, सभेच्या सुरुवातीलाच अजेंड्यावरील विषय घ्यायचे की नंतर घ्यायचे यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते.
महापालिकेच्या सभागृहात महापौर चंद्रकांत सोनार यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन महासभा पार पडली. यावेळी आयुक्त अजिज शेख, नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह विरोधी पक्षनेते साबीर शेख, प्रदीप कर्पे, अमोल मासुळे, संजय पाटील, प्रतिभा चौधरी, नागसेन बोरसे, अमीन पटेल, शितल नवले, वंदना भामरे, कमलेश देवरे, किरण अहिरराव यांच्यासह १० ते १५ नगरसेवक प्रत्यक्षात सभागृहात हजर होते. तर, बाकीचे आॅनलाईन सहभागी झाले होते.
शेवटून विषय घेण्याची
मागणी फेटाळली
सभेच्या सुरुवातीला नगरसेवक संजय पाटील यांनी महासभेतील विषय पत्रिकेतील विषय खालून वर या उलट्या क्रमवारीने सभेत घ्यावे अशी मागणी केली. अत्यंत महत्वाचे, धोरणात्मक विकासाचे आणि आर्थिक विषय शेवटी टाकून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. या विषयाला शितल नवले यांनी साथ दिली. मात्र महापौरांनी या मागणीला नकार देत क्रमाने विषय घेतले जाईल असे सांगत सभेतून कोणीही अधिकाऱ्यांनी जावू नये असे आदेश काढले.
अजेंड्यावरुन आमने-सामने
साबीर शेख यांनी पाणी आणि स्वच्छता यावर सभेच्या सुरुवातीला प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला. पण, अजेंड्यावरील विषय घ्या, नंतरचे विषय शेवटी घेण्यात यावे अशी मागणी केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने आले. शितल नवले आणि शाबीर शेख यांच्यात कलगीतुरा रंगल्याने वाद मिटविण्यासाठी अमोल मासुळे, देवेंद्र सोनार, प्रदीप कर्पे यांनी वाद मिटविला.
इतिवृत्त मिळावे
कोणत्याही सभेचे इतिवृत्त मिळत नाही. आम्ही काय बोलतो, प्रत्यक्षात काय लिहिले जाते याची माहिती आम्हाला मिळावी अशी मागणी नगरसेवक हर्ष रेलन यांनी महापौरांकडे केली. त्यामुळे पुढील सभेपासून इतिवृत्त देण्याचे महापौरांनी मान्य केले. त्याची अंमलबजावणी होणार आहे़