काँग्रेस - राष्टÑवादीची अस्तित्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:36 IST2019-11-20T13:34:48+5:302019-11-20T13:36:24+5:30
जि.प. व पं.स.निवडणूक : अमरिशभाई, दहितेंच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील

Dhule
धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ७ जानेवारी २०२० रोजी ५६ गट व ११२ गणांसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसचे माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा परिषदेतील मातब्बर नेते भाजपमध्ये गेल्याने यंदाची जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील. भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादीसाठी जिल्हा परिषदेतील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
धुळे जिल्हा परिषदेवर स्थापनेपासूनच मधले अडीच वर्ष वगळता सतत काँग्रेसची अबाधित सत्ता राहिली आहे. गेल्या निवडणुकीसुद्धा काँग्रेस - राष्टÑवादीचीच सत्ता जिल्हा परिषदेवर होती. काँग्रेसचे शिवाजीराव दहिते हे अध्यक्ष होते.
अमरिशभाईचा भाजप प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे माजी आमदार व नेते अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शिंदखेड्यात डॉ.हेमंत देशमुख गटातील मातब्बर नेतेमंडळीने भाजपमध्ये प्रवेश केला. ृ
तर काँग्रेस आघाडीतील मित्रपक्ष राष्टÑवादीचे प्रमुख नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीसुद्धा राष्टÑवादी पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन्ही पक्षाची अशी बिकट परिस्थिती असतांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. ही निवडणूक म्हणजे काँग्रेस - राष्टÑवादी पक्षासाठी आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी लढावी लागणार आहे. काँग्रेसकडे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शाम सनेर हे दोन नेते प्रमुख आहेत. राष्टÑवादीत जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आणि माजी जि.प.सभापती किरण पाटील, माजी अध्यक्ष संदीप बेडसे आहेत. या सर्वच नेत्यांना आपली प्रतिष्ठापणाला लावून ही निवडणूक लढावी लागणार आहे.
या निवडणुकीत शिवसेना ही आघाडीसोबत राहण्याची शक्यता आहे. परंतू गेल्या जिल्हा परिषदेतील निकाल पाहता शिवसेना आघाडीसोबत गेलीतरी फारसा फरक पडणार नाही, असे आजतरी वाटते. एकूणच काँग्रेस - राष्टÑवादी आणि शिवसेना सोबत आल्यास महाशिवआघाडीतील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
भाजपचे वर्चस्व वाढले
दुसरीकडे भाजपचे राजकीय वर्चस्व निश्चित वाढले आहे. भाजपकडे माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्यासह नव्याने दाखल झालेला माजी आमदार अमरिशभाई पटेल यांचा अँकर गट यामुळे आजतरी चारही तालुक्यात भाजपचे वर्चस्व आघाडीपेक्षा जास्त दिसते. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील, असे आजतरी दिसते.
त्यात आता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण निघाले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अनेक दिग्गज या निवडणुकीत आपले नशिब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरतील. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.