लॉकडाऊन काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:55+5:302021-02-05T08:44:55+5:30

गुन्हे परत कसे घेतले जातात लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेली संचारबंदी आणि याच कालावधीत काही लाेकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे हा ...

Confusion about withdrawal of filed offenses during the lockdown period | लॉकडाऊन काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत संभ्रमावस्था

लॉकडाऊन काळातील दाखल गुन्हे मागे घेण्याबाबत संभ्रमावस्था

गुन्हे परत कसे घेतले जातात

लॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेली संचारबंदी आणि याच कालावधीत काही लाेकांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे हा चिंतेचा विषय ठरलेला होता. आता गुन्हे मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असे असलेतरी ज्या ज्या पोलीस स्टेशनअंतर्गत जे गुन्हे दाखल होतात, ते गुन्हे परस्पर मागे घेतले जात नाही. न्यायालयात गुन्हे मागे घेण्याबाबतचे ठोस पुरावे, कागदपत्रे सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे मागे घेण्याबाबत विचार होत असतो. यात न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे.

विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्यांवर सर्वाधिक गुन्हे

- लाॅकडाऊन असल्यामुळे लोेकांच्या भल्यासाठी संचारबंदी लागू केली होती. लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर निघू नये, एवढाच उद्देश त्यामागे होता. तरीदेखील शासन आदेशाचे उल्लंघन करून घराबाहेर पडणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे हे अन्य गुन्ह्यांपेक्षा तसे सर्वाधिक ठरले.

- संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ निश्चित करण्यात येऊनही बरीच दुकाने ही ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त सुरू होती. त्यांना वेळोवेळी समजदेखील देण्यात आली. पण त्यांच्यात काही फरक पडत नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ आली. नियमांचे पालन त्यांच्याकडून होताना दिसून आले नाही.

- लॉकडाऊन काळात बंदी असतानादेखील जमाबंदी आदेशाचे उल्लंघनदेखील अनेकांकडून झाले आहे. गर्दी न करणे असे अभिप्रेत असतानादेखील विनाकारण त्यांच्याकडून गर्दी केली जात होती. तसेच जिल्हाबंदी केली गेली असतानादेखील प्रवास करण्याचे बऱ्याच जणांनी काही टाळले नाही. परवानगी नसताना प्रवास करणारे आढळल्यामुळे त्यांच्यावरदेखील पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षकांचा कोट

लॉकडाऊन काळात लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात काही जणांवर कारवाई करण्याची वेळ आली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले आहेत. आता दाखल झालेले गुन्हे मागे घ्यायचे का नाही, हे शासन ठरवेल. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेताना शासनाच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल.

- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक, धुळे.

लॉकडाऊन काळात दाखल गुन्हे - ६९३

विनापरवानगी घराबाहेर पडणे - ५५१

जास्त वेळ दुकान सुरू ठेवणे - १२२

विनापरवानगी प्रवास करणे - १५

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे - ०५

Web Title: Confusion about withdrawal of filed offenses during the lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.