कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या वजन कमी झाल्याच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:00+5:302021-02-05T08:44:00+5:30
औषधांचा प्रभाव व विश्रांतीमुळे काही रुग्णांचे मात्र वजन वाढले धुळे : जिल्ह्यातील १४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली ...

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या वजन कमी झाल्याच्या तक्रारी
औषधांचा प्रभाव व विश्रांतीमुळे काही रुग्णांचे मात्र वजन वाढले
धुळे : जिल्ह्यातील १४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांनी वजन कमी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. तसेच काही रुग्णांचे वजन वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध औषधांमुळे तसेच विश्रांतीमुळे काही बऱ्या झालेल्या रुग्णांचे वजन वाढले आहे. कोरोनावर मात केल्यानंतर किंवा कोरोना झाल्यानंतर औषधोपचार घेत असताना वजन कमी झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच बऱ्याच रुग्णांनी कोरोना झाल्यानंतर मानसिक ताण घेतल्यामुळे त्यांचे वजन कमी झाले असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र काही रुग्णांचे वजनही वाढले आहे. स्टेरॉईडमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. काही कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान स्टेरॉइड दिल्यामुळे त्या रुग्णांचे वजन वाढले आहे.
कोरोना झाल्यानंतर ७ किलो वजन कमी झाले
१ - मोहाडी येथील रहिवासी व नवापूर येथे गटविकास अधिकारी असलेल्या शालिग्राम पाटील यांना कोरोनाची बाधा झाली होती. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यानंतर ते आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. मात्र बरे झाल्यानंतर त्यांचे ७ किलो वजन कमी झाले आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याआधी त्यांचे वजन ६५ किलो इतके होते. बरे झाल्यानंतर मात्र त्यांचे वजन ५८ किलो इतके झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
२ - पाटील यांना किडनीचा त्रास असल्याने त्यांना नियमित डायलिसिस करावे लागते. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी मात्र डायलिसिसची सुविधा नव्हती. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने तातडीने डायलिसिसची सुविधा उपलब्ध केली होती. त्यानंतर ८ कोरोना बाधित रुग्णांना डायलिसिस सुविधेचा लाभ झाला होता.
३ - शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला वजन वाढल्याचा त्रास झाला होता. बरे झाल्यानंतर त्याचे ५ किलो वजन वाढले होते.
स्टेरॉइड दिले जाते त्यामुळेही वाढते वजन -
* काही कोरोनाबाधित रुग्णांना उपचार सुरू असताना स्टेरॉइड दिले जाते. त्यामुळे बरे झाल्यानंतर त्या रुग्णाचे वजन वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. मात्र अशा रुग्णांची संख्या कमी आहे. उपचार सुरू असताना सर्वच रुग्णांना स्टेरॉइड दिले जात नाही. ज्यांना आवश्यकता असेल अशा मोजक्या रुग्णांनाच अशाप्रकारचे उपचार करण्यात येतात.
* कोरोनाचा संसर्ग झालेल्या व त्यातून बरे झालेल्या काही रुग्णांचे वजन मात्र कमी झाले आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये वजन कमी झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाची भीती जास्त होती. तसेच कोरोना आजाराबद्दल गैरसमजही होते. संसर्ग झाल्यामुळे मानसिक तणावात काही रुग्ण होते. त्यामुळे त्यांचे वजन कमी झाले असावे, असे तज्ज्ञ सांगतात.
प्रतिक्रिया -
कोरोनामुक्त झाल्यानंतर बऱ्याच रुग्णांचे वजन घटले आहे. तसेच वजन वाढल्याच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. हलक्या स्वरूपाचा व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच मधुमेह व हृदयरोग असलेल्या रुग्णांनी औषधे नियमित घ्यावीत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करण्याची गोळी घ्यावी.
डॉ. विशाल पाटील, जिल्हा कोरोना नोडल अधिकारी