जाहिरात फलकांवर दादागिरीने शहरभर पैलवानांच्या वाढदिवसांचे अवैध बॅनर, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:07 IST2021-02-06T05:07:51+5:302021-02-06T05:07:51+5:30

धुळे- शहरात जाहिरात कंपन्यांच्या अधिकृत होर्डिंगवर त्यांच्या संमतीशिवाय पहिलवान, गुंड व पुढाऱ्यांच्या वाढदिवसांच्या जाहिरातींचे बॅनर परस्पर दादागिरीने लावण्याचे प्रमाण ...

Complaints to Superintendent of Police about illegal banners of wrestlers' birthdays across the city | जाहिरात फलकांवर दादागिरीने शहरभर पैलवानांच्या वाढदिवसांचे अवैध बॅनर, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

जाहिरात फलकांवर दादागिरीने शहरभर पैलवानांच्या वाढदिवसांचे अवैध बॅनर, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

धुळे- शहरात जाहिरात कंपन्यांच्या अधिकृत होर्डिंगवर त्यांच्या संमतीशिवाय पहिलवान, गुंड व पुढाऱ्यांच्या वाढदिवसांच्या जाहिरातींचे बॅनर परस्पर दादागिरीने लावण्याचे प्रमाण खूप वाढून गेले आहे. अशा पहिलवान व गुंडावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नॉर्थ महाराष्ट्र अ‍ॅडव्हर्टायझर्स असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व मनपा आयुक्त अजिज शेख यांना देण्यात आले.

या संदर्भात धुळे, जळगाव, नाशिक येथील असोसिएशनच्या सदस्यांची तातडीची बैठक धुळ्यात झाली. त्यात ठरल्याप्रमाणे हे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की धुळे शहरातील काही पहिलवान, गुंड, राजकीय कार्यकर्ते आमच्या मालकीच्या जाहिरात फलकांवर परस्पर दादागिरीत वाढदिवस बॅनर लावत असल्याने, वाद होऊन कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे, अशा असामाजिक तत्त्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

पुढे म्हटले आहे, की धुळे शहरात विविध भागात आम्ही मनपाची रीतसर परवानगी घेऊन डिपॉझिट भरून व दरवर्षी लाखो रुपये जाहिरात कर भरून रितसर मोठे जाहिरात फलक लावले आहेत. या फलकांपासून मनपाला वार्षिक लाखो रुपये उत्पन्न मिळत आहे. असे निदर्शनात आले आहे, की,शहरातील काही पहिलवान, गुंड व राजकीय कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीचे मोठ मोठे बॅनर आमच्या या अधिकृत जाहिरात फलकांवर आम्हाला न विचारता, आमची परवानगी न घेता परस्पर लावून टाकतात. यामुळे या फलकांवर आम्ही लावलेली कंपनीची अधिकृत जाहिरात झाकली जाते. त्यामुळे कंपनीवाले व आमच्यात वाद होतो. फसवणूक केली म्हणून कंपनीवाले बिले देत नाहीत. ग्राहक मंचात ते जाऊ शकतात. याशिवाय फलकांवर आम्ही अधिकृतपणे लावलेल्या किंवा बुकिंग असलेल्या स्थानिक जाहिरातदार पार्टीत व त्यावर अशा दादागिरीने वाढदिवस बॅनर लावणाऱ्या पहिलवान, गुंडांमध्येही परस्पर वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. देवपूर पोलीस स्टेशनने दोन वर्षांपूर्वी मनस्वर प्रिंटर्स व अशा पहिलवानांवर कार्यवाही केली होती.

आमच्या फलकांवर पहिलवान, गुंडांनी परस्पर वाढदिवस जाहिरात लावल्याने आम्ही घेतलेल्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला रद्द करून आम्हाला नेहमी रक्कम परत करावी लागते. त्यामुळे बिले बुडीत होतात. धुळे शहरात नेहमीच पहिलवान, गुंड मंडळी परस्पर वाढदिवसाचे बॅनर कंपन्यांच्या अधिकृत जाहिरातींवर ओव्हरलॅप करून लावतात. हा संदेश मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील कंपन्यांमध्ये गेलेला असल्याने, ते त्यांच्या राज्यभराच्या जाहिराती कॅम्पेनमध्ये धुळे शहर वगळण्यास लागले आहेत. एकप्रकारे धुळे शहर ब्लॅक लिस्टेड होण्याचा संभव आहे. यामुळे राज्यात धुळे शहराची अपकीर्तीही होण्याची शक्यता आहे.

धुळे शहरात नुकतेच एका पहिलवानाने आमच्या अनेक अधिकृत फलकांवर संपूर्ण शहरभर वाढदिवसाचे बॅनर आमच्या परवानगीशिवाय परस्पर अनधिकृतपणे लावले आहेत. या सर्व जागांच्या फोटो प्रिंटसोबत जोडलेल्या आहेत. याबाबत खात्याने स्वत: संज्ञान घेऊन वाढदिवसवाले दादा मंडळी, त्यांचे प्रिंटर व आमच्या होर्डिंगवर बेकायदेशीरपणे चढून बॅनर फिटिंग करणारे कारागीर यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.

Web Title: Complaints to Superintendent of Police about illegal banners of wrestlers' birthdays across the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.