गेल्या १५ वर्षांपासून कापडणे ग्रामपंचायत सोनवद प्रकल्प व देवभाने धरणातून दूषित पाण्याचा नळांना पाणी पुरवठा करीत आहे. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळांना विशेष करून उन्हाळ्यात अत्यंत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतीमार्फत केला जात असतो. हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने अखेर गेल्या अनेक वर्षांपासून कापडणे गावाची जनता खासगी शुद्ध जल केंद्रावरून विकतचे फिल्टर पाणी आणत आहे. मात्र ग्रामपंचायतीने पाणीपट्टी करात ३६० रुपयांवरून दुपटीचा ७२० रुपये वाढीव कर वसूल केला आहे. यासोबतच वाढीव घरपट्टी देखील लादली आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना काळात प्रत्येकाचे व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वत्र जनता होरपळून गेली आहे. त्यात अजून दुपटीचा ग्रामपंचायतीचा पाणीपट्टी व घरपट्टीचा कर ग्रामस्थांवर लादल्याने ग्रामस्थांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिल २०२० पूर्वी एका नळ कनेक्शनसाठी ३६० रुपये पाणीपट्टी कर होता, तो आता ७२० रुपये झाला. यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीत १५ लाख ३२ हजार ९१० रुपये जमा होणार आहेत. दरम्यान, शासन निर्णयाप्रमणे करात वाढ करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी सांगितले.