आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन केली स्वच्छतेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:39 IST2021-08-22T04:39:03+5:302021-08-22T04:39:03+5:30
शहरातील स्वच्छतेबाबत शनिवारी आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी यांनी शहर आरोग्य विभागाचा ...

आयुक्तांनी घटनास्थळी जाऊन केली स्वच्छतेची पाहणी
शहरातील स्वच्छतेबाबत शनिवारी आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी यांनी शहर आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी शहरातील विविध भागात जाऊन अचानक फेरफटका मारत सर्व स्वच्छता निरीक्षक व मुख्य निरीक्षकांनी झाडाझडती घेतली. यावेळी देवपूर, कुमारनगर, स्टेशनरोड, चाळीसगाव रोड, हजारखोली परिसरात जाऊन पाहणी केली. यात आयुक्त अजिज शेख यांनी जे नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात व प्रामुख्याने गॅरेजवाले, हातगाडी, दुकानदार अशा वर्गातील बहुतांश नागरिक कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे निदर्शनात आले. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना मुख्य स्वच्छता निरीक्षक व सर्व स्वच्छता निरीक्षक यांना देण्यात आल्या.
घंटागाडी केले नियोजन
शहरातील काही भागात घंटागाडी येत नाही अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे परिसरातील संबधित नागरिकांना रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेवर कचरा उघड्यावर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी होते. संबंधित भागातील स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी निकामी लावण्यासाठी प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला बोलावून घंटागाडीचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी कचऱ्याचे प्रमाण जास्त होते अशा ठिकाणी स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांच्या कामामध्ये सुधारणा न केल्यास स्वच्छता निरीक्षकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ही ताकीद आयुक्त अजिज शेख यांनी दिली.
सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांच्या कामात सुधारण्यासाठी आपापल्या प्रभागातील घंटागाड्यांचे योग्य नियोजन करावे, नालेसफाई व गटार सफाई नियमितपणे करावी, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, मलेरिया फवारणी करण्याचे आदेश दिलेत.
अग्निशमन दलाचा आढावा
आयुक्त शेख यांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयास भेट देऊन अग्निशमन विभागातील स्वच्छता उपस्थित कर्मचारी व वाहन याबाबतचा आढावा घेण्यात आला. तसेच हजारखोली परिसरातील सार्वजनिक दवाखान्यातील कोविड लसीकरण केंद्रास भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.