पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 12:21 IST2020-12-18T12:21:09+5:302020-12-18T12:21:23+5:30
धुळे : शहरात ठिकठिकाणी कॉम्प्लेक्स उभारत असताना पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. ते नियमाला अनुसरुन देखील आहे. पण, ...

dhule
धुळे : शहरात ठिकठिकाणी कॉम्प्लेक्स उभारत असताना पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. ते नियमाला अनुसरुन देखील आहे. पण, शहरात बहुतेक ठिकाणी पार्किंगची कोणत्याही प्रकारची सोय केलेली दिसत नाही. परिणामी वाहनधारक बिनधास्तपणे वाहने पार्किंग करुन मोकळे होत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगच्या जागेवर व्यावसायिकांकडून वापर होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे महापालिकेने वेळीच लक्ष देवून हा प्रश्न निकाली काढायला हवा.
शहरात अशा कितीतरी जुन्या काळातील कॉम्प्लेक्स आहेत की पार्किंगची कोणत्याही प्रकारची सोय करुन देण्यात आलेली नव्हती. त्या काळात देखील वाहनांची संख्या कमीच होती. इतक्या लवकर मोठ्या प्रमाणावर वाहने बाजारात येतील अशी कोणालाही वाटत नव्हते. आता त्याच ठिकाणी पार्किंगची समस्या ही जटील झाली आहे. त्यात शहरातील सहावी गल्लीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आलेला आहे. त्या काळी या रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती की बँका आणि अन्य संस्था देखील कार्यरत नव्हत्या. आता त्याच ठिकाणी वेगवेगळ्या बँकाच्या शाखा, संस्था आल्याने वाहने अक्षरश: रस्त्यावर लावण्यात येत आहेत. यामुळे या भागातील नागरीकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशी स्थिती असताना बऱ्याच ठिकाणी असे चित्र पहावयास मिळत आहे.
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत गेला. परिणामी कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. त्यात त्यांनी तळमजल्यावर पार्किंगची सोय करणे अनिवार्य होते. पण, बहुतांश ठिकाणी पार्किंगची सोय केलेली दिसत नाही. त्यामुळे खालपासूनच दुकाने सुरु होत असतात. वरच्या मजल्यापासून वरती नागरीकांसाठी निवासस्थाने उभारण्यात आलेली आहे. त्यांची देखील वाहने ही रस्त्यावर येतात. याला कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याचे समोर येत आहे.
शहरातील दत्त मंदिर चौकासह अन्य काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स दिसून येतात. याशिवाय असे काही मोठ्या स्वरुपाचे दवाखाने आहेत तेथे देखील पार्किंग सोय स्वतंत्र्यपणे केलेली नाही. ही बाब कालांतराने अपघात आमंत्रण देवू शकते. ही बाब सर्वांनी गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. मुळात बांधकाम करताना ही बाब अधोरेखित करायला हवी. पार्किंगसाठी स्वतंत्र्यपणे व्यवस्था करायला हवी. पण, असे होताना दिसत नाही.
याकडे महापालिकेने वेळीच लक्ष देवून अशा कॉम्प्लेक्सवर योग्य त्या प्रकारे कारवाई करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवणार नाही, सर्वच काळजी घेतील.