नाम फाऊंडेशनकडून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST2021-02-09T04:38:31+5:302021-02-09T04:38:31+5:30
धुळे - नाम फाऊंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यातील गावांमध्ये जलसंधारणाच्या कामाला ...

नाम फाऊंडेशनकडून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात
धुळे - नाम फाऊंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भूजल अभियानांतर्गत चाळीसगाव तालुक्यातील गावांमध्ये जलसंधारणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून नाम फाऊंडेशनमार्फत संपूर्ण महाराष्ट्रात नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी जलसंधारणाचे काम हाती घेतले आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथे मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम पूर्णत्वास आले आहे व लाखो लीटर पाणी भूगर्भात साठविण्यात यश आले असून, त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षात खानदेशातही जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्यात धुळे, नंदुरबार, शहादा, जयनगर, धांद्रे, लामकानी, बोरकुंड, मांडळ या गावात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी कोरोना महामारी काळात जलसंधारणाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी लाॅकडाऊन शिथील होताच आगामी पावसाळ्याच्या आतच जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना कसा फायदा देता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. या अनुषंगाने खानदेशातील चाळीसगाव तालुक्यातील कुंजर गावात पोकलेन टू टेन मशीन देऊन जलसंधारणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील, धर्मा आबा, विकी थोरात व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढे येऊन नाम फाऊंडेशनच्या जलसंधारण कामाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नाम फाऊंडेशनकडून करण्यात आले आहे.