वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता गाव बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:42+5:302021-04-09T04:37:42+5:30
पिंपळनेर शहरात रुग्ण संख्या वाढली आहे. तसेच परिसरातील ग्रामीण भागातही आता कोरोना पाेहोचलेला आहे. एवढेच नाही तर मृत्यूची ...

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता गाव बंद करा
पिंपळनेर शहरात रुग्ण संख्या वाढली आहे. तसेच परिसरातील ग्रामीण भागातही आता कोरोना पाेहोचलेला आहे. एवढेच नाही तर मृत्यूची संख्याही वाढलेली आहे. कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. मात्र, हे मिनी लॉकडाऊन नावालाच आहे. गाव व परिसरातील अनेक दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. जमावबंदीचा आदेश असला तरी अनेकजण चौकाचौकांमध्ये गर्दी करतांना दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचा सर्वांनाच विसर पडलेला दिसून येत आहे.
अनेकांकडे बाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यांच्या संपर्कातील नातेवाईक बेड मिळविण्यासाठी धडपड करतांना दिसून येत आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांच्या घरातील सदस्य बाहेर फिरताना दिसत आहेत. कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी सदस्य कोणी रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळेल का? कोणी रक्त देईल का? कोणी प्लाझ्मा देणार का? अशी विचारणा करीत असल्याने प्रत्येक रुग्णाच्या सदस्यांची धावपळ पाहण्यास मिळत आहे.
अशी कठीण परिस्थिती असतांना अनेकजण विनामास्क फिरत आहेत. व्यावसायिकही फिजिकल डिस्टन्सिंगचे अजिबात पालन करतांना दिसत नाहीत. अशीच परिस्थिती राहिली तर कोरोना कसा नियंत्रणात येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी गाव पूर्णत: बंद करण्यात यावे, अशी मागणी सूज्ञ नागरिकांनी केेलेली आहे.