निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 22:16 IST2021-01-18T22:15:43+5:302021-01-18T22:16:03+5:30
१७ पैकी १० जागा जिंकल्या : गावात फटाक्यांची आतषबाजी

निजामपूर ग्रामपंचायतीवर शहर विकास आघाडीचे निर्विवाद बहुमत
निजामपूर : साक्री तालुक्याचे लक्ष लागलेल्या निजामपूर ग्राम पालिका निवडणुकीत शहर विकास आघाडीने बाजी मारत १७ पैकी १० जागांवर निर्विवाद बहुमत मिळविले़ तर ग्राम विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. अत्यंत चुरस असलेल्या वार्ड क्र ६ मध्ये एका जागेवर स्वतंत्र उमेदवाराने बाजी मारली़ दरम्यान, निजामपूरची निवडणूक कोणत्याही पक्ष्याच्या चिन्हावर लढली गेली नव्हती.
गावाच्या विकासाचा मुद्दा दोन्ही पॅनेलने मतदारांपुढे ठेवत प्रचार केला होता़ यंदाच्या निवडणुकीत तीन उमेदवार वगळता सर्वच उमेदवार नवीन होते. बाहेरचे कुणीही नेते प्रचारासाठी आले नव्हते. स्थानिक संबंध आणि रुसवे फुगवे मतदारांनी मनात ठेवत मतदान केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मतदार हे शांत होते, त्यांनी कळू न देता मतदान केल्याचे निकालावरुन समोर येत आहे़ यात केवळ चुरस होती ती उमेदवारांमध्येच. विजयाचा दावा बहुतेक सर्व उमेदवार करीत होते. पण निश्चित अंदाज येत नव्हता.
विजयी झालेल्या शहर विकास आघाडीचे उमेदवार या प्रमाणे, वार्ड १ मध्ये शाम पवार, जिजाबाई सोनवणे, वार्ड ३ मध्ये महेंद्र वाणी, शितल गजानन शहा, शोभा चिंचोले, वार्ड ४ मध्ये विजय राणे, नीलिमा भार्गव, कविता पवार, वार्ड ६ मध्ये सुरेंद्र विसपुते, सुनीता परदेशी असे १० उमेदवार विजयी झाले आहेत़
ग्राम विकास पॅनलने वार्ड २ आणि ५ मधील सर्व जागा म्हणजे ६ पैकी ६ जागा पटकावल्या आहेत. त्यात वार्ड २ मध्ये मुस्ताकखान पठाण, सोनाली चौधरी, सपना मोरे़ वार्ड ५ मध्ये पुष्पांजली बच्छाव, रमेश कांबळे, ताहीरबेग मिर्झा विजयी झाले आहेत़
वार्ड ६ मध्ये नामाप्र जागेवर अत्यंत चुरशीची लढत उभी ठाकली होती. शहर विकास आघाडीतर्फे वासुदेव दत्तात्रय बदामे तर स्वतंत्र उमेदवार परेश चंद्रकांत वाणी यांच्यात अत्यंत काट्यची टक्कर झाली. पण बाजी स्वतंत्र उमेदवार परेश वाणी यांनी मारली व ते विजयी झाले. शहर विकास आघाडी तर्फे गड आला पण सिंह गेला अश्या घोषणा सोशल मीडिया वर व्हायरल झाल्या. ढोल ताश्यांच्या गजरात फटाके फोडत काढलेल्या मिरवणुकीत गुलाल उधळत ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मतदारांचे घरोघरी जाऊन आभार मानले़ शहर विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांनी जेष्ठ नेते शरद शाह यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.