कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST2021-06-26T04:25:10+5:302021-06-26T04:25:10+5:30
धुळे : कोरोनातून बरे झालेल्या लहान बालकांना मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा (एमएसआयसी) धोका वाढला आहे. कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला या ...

कोरोनातून सावरलेल्या बालकांना एमएसआयसी आजाराचा धोका !
धुळे : कोरोनातून बरे झालेल्या लहान बालकांना मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा (एमएसआयसी) धोका वाढला आहे. कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला या आजाराचा धोका असतो. आता मात्र लहान बालकांमध्येही अशी लक्षणे दिसत आहेत. लहान बालकांना खूप ताप येणे, पाच दिवसांपर्यंत ताप कमी न होणे, डोळे लाल होणे, त्वचेवर रॅशेस पडणे, मळमळ व उलट्या होणे, पोटात सतत दुखणे अशाप्रकारचे त्रास या आजारामुळे होतात. कोरोनातून बरा झालेल्या बालकामध्ये असे लक्षणे दिसत असतील तर तात्काळ बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जून महिन्यात आतापर्यंत दोनवेळेस शून्य रुग्णाची नोंदही झाली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली आहे. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत दोन हजार ६०० बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते सर्व रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये एकाही बालकाचा समावेश नसल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
दुसऱ्या लाटेत २६०० बालकांना कोरोना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील दोन हजार ६०० बालकांना कोरोनाची लागण झाली होती. संसर्ग झालेले सर्व बालक बरे झाली आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांमध्ये एकाही लहान बालकाचा समावेश नाही.
..ही घ्या काळजी
१ मुलांना मास्कशिवाय घराबाहेर पडू देऊ नका. कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा. कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवा.
२ कोरोना प्रतिबंधात्मक नियमांबाबत मुलांना जागरूक करा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवायची सवय लावा. त्यांच्यावर स्वच्छतेचे संस्कार करा.
३ कोरोनातून बरे झालेल्या बालकांची बालरोग तज्ज्ञांकडून वेळोवेळी तपासणी करून घ्या. बालकांना त्रास जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका.
प्रतिक्रिया -
बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या -
कोरोनातून बरे झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये अशा पद्धतीचा त्रास दिसून येतो. मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये. लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षणे जाणवली तर बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. दुखणे अंगावर न काढता लवकर उपचार घ्यावे.
- डॉ. विशाल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी
कोरोनाचे एकूण रुग्ण - ४२,४४८
कोरोनावर मात केलेले रुग्ण- ४१,७१९
एकूण कोरोना मृत्यू ६६८
उपचार घेत असलेले रुग्ण ६१