धुळ्यातील बाहुबली नगरात दिवसा चेनस्रॅचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 17:55 IST2018-06-17T17:55:13+5:302018-06-17T17:55:13+5:30
वृध्द महिलेची फिर्याद : ४५ हजाराचा मुद्देमाल

धुळ्यातील बाहुबली नगरात दिवसा चेनस्रॅचिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पत्ता विचारण्याचा बहाणा करत दोघां भामट्यापैकी एकाने वृध्द महिलेची सोनपोत ओरबडून पोबारा केल्याची घटना साक्री रोडवरील बाहुबली नगरात सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात दुपारी फिर्याद दाखल झाली़
साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मागे बाहुबली नगर प्लॉट नंबर ६६ मध्ये जयश्री अशोक दुसाने (६७) हे आपल्या परिवारासोबत राहतात़ सकाळची वेळ असल्यामुळे घरातील साफसफाई केल्यानंतर जमा झालेला कचरा कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या बादलीत टाकण्यासाठी ही महिला घराबाहेर आली होती़ कंपाऊंडला कुलूप लावलेले होते़ बाहेर दोन जण दुचाकी घेऊन उभे होते़ त्यातील एकाने पत्ता विचारण्याचा बहाणा करत कंपाऊंडजवळ येऊन वृध्द महिलेला हाका मारु लागला़ कागदाचा तुकडा त्या महिलेच्या हातात दिल्यानंतर नजर चुकवून गळ्यातील ४५ हजार रुपये किंमतीची सोनपोत ओरबडून दोघांनी पोबारा केला़ या घटनेनंतर वृध्द महिलेने आरडा-ओरड केला, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही़
याप्रकरणी त्या वृध्द महिलेने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली़ त्यानुसार दोघा भामट्यांविरुध्द भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़