धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. त्यापैकी एक जागा यापूर्वीच बिनविरोध झालेली असून, आता १६ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, वॉर्ड क्रमांक ४ मध्ये तीन जागा होत्या. त्यापैकी एक जागा बिनविरोध झालेली असून, आता दोन जागांसाठी लढत आहे. बोरसे गल्लीतील एकाच भाऊबंदकीतील नात्याने आजोबा असलेले अमोल सुरेश पाटील व नातू शशिकांत प्रकाश पाटील हे दोन्हीही तुल्यबळ उमेदवार वाॅर्ड क्रमांक ४ क मधील सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवीत आहेत. विशेष म्हणजे आजोबा व नातू हे दोघेही पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेले आहे. याच जागेसाठी सुभाष गुलाब पाटील व विजय भानुदास भामरे हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत.
त्यामुळे संपूर्ण गावाचे लक्ष वॉर्ड क्रमांक ४ कमधील लढतीकडे लागलेले आहे. या ठिकाणच्या निवडणुकीत आजोबा नातूला मात देतात की नातू आजोबासमोर सरस ठरतो की दोघांच्या लढतीत तिसऱ्या उमेदवाराचा फायदा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
कापडणे ग्रामपंचातीवर वर्चस्व कोणाचे राहणार याकडे आता परिसराचे लक्ष लागून राहिलेले आहे.