कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:48+5:302021-04-09T04:37:48+5:30
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर द्विसदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यावर ...

कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक दाखल
धुळे : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर द्विसदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पथक जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेत आहे. गुरुवारी पथकाने जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील लसीकरण केंद्र, सिटी स्कॅन विभाग व कोविड सेंटरची पाहणी केली, तर शुक्रवारी हिरे वैद्यकीय महाविद्यालय व शहरातील कंटेन्मेंट झोनची पाहणी पथकाकडून करण्यात येणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले. पथकात दिल्ली येथील डॉ. आर.पी. सैनी व कोलकाता येथील डॉ. साधुकान यांचा समावेश आहे. डॉ. आर.पी. सैनी यांचे सकाळी, तर डॉ. साधुकान यांचे संध्याकाळी आगमन झाले. डॉ. सैनी यांनी गुरुवारी सकाळी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. कोविड वॉर्डात भेट देऊन रुग्णांवरील उपचारांची माहिती घेतली, तसेच कोरोना चाचणी व लसीकरण केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. संजय शिंदे, उपायुक्त गणेश गिरी, शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.
आज कंटेन्मेंट झोनची पाहणी
केंद्रीय पथक शुक्रवारी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देणार आहे, तसेच शहरातील कंटेन्मेंट झोनचीही पाहणी करणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन केंद्रीय पथकातील सदस्य मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी दिली.