कार-दुचाकी अपघात, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 22:19 IST2021-02-23T22:18:47+5:302021-02-23T22:19:07+5:30
सोनगीरनजीक डांगुर्णे गावाजवळील घटना

कार-दुचाकी अपघात, एक ठार
धुळे : भरधाव वेगाने येणारी कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाला. यात गंभीर जखमी झाल्याने एक जण ठार झाल्याची घटना सोनगीरनजीक डांगुर्णे गावाजवळ २१ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कार चालकाविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमएच १८ बीजी ०६४९ क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या एमएच १८ बीजी ८४५९ क्रमांकाच्या दुचाकीला ती धडकली. या अपघातामुळे दुचाकीवरील दोघे जण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. धुळे तालुक्यातील सोनगीर ते दोंडाईचा दरम्यान डांगुर्णे गावाच्या अलीकडे ही अपघाताची घटना २१ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चेतन रामसिंग गिरासे (२५, रा. सोनशेलू ता. शिंदखेडा) यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर चेतन हा रस्त्यावरच विव्हळत पडला होता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
या प्रकरणी नरेंद्र भगवानसिंग गिरासे (३८, रा. सोनशेलू ता. शिंदखेडा) यांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात २२ फेब्रुवारी रोजी पहाटे दीड वाजता फिर्याद दाखल केल्याने कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वळवी घटनेचा तपास करीत आहेत.