मात्र मतदार आपल्या जवळचा असला तरी त्याला भेटण्यात उमेदवाराला अडचण येऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सध्या ग्रामीण भागात शेतीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे मजूर वर्ग, शेतकरी वर्ग सकाळी ८ वाजेपासूनच शेताकडे रवाना होत आहे. तसेच दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत आहे. त्यामुळे दिवसभरात ग्रामीण भागात अतिशय शुकशुकाट असतो. लहान मुले, ज्येष्ठ मंडळीशिवाय गावात चिटपाखरू नसते. त्यामुळे उमेदवार गावात आणि मतदार शेतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे.
अशा स्थितीत उमेदवाराला प्रचारासाठी काही मोजके तास मिळत आहेत. सकाळी एक- दीड तास व सायंकाळी दीड-दोन तास. एवढ्या कमी कालावधीत प्रचार करताना, आपली बाजू मांडताना उमेदवारांना सध्या चांगलीच कसरत करावी लागत आहे. कारण आता मतदानासाठी अवघे सातच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अशीच स्थिती राहिली तर प्रचार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पक्षीय पाठबळ नाही
नगरपालिकेपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत उमेदवारांना पक्षाचे पाठबळ असते. पक्षाचे नेते उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असतात. विविध ठिकाणी बैठका, मेळावे घेत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची बाजू भक्कम होत असते. मात्र या निवडणुकीत तसे नाही. उमेदवारच पक्ष आणि उमेदवारच नेता अशी स्थिती आहे. त्यामुळे स्वबळावर प्रचार करूनच मतांचा जोगवा मागावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघावयास मिळत आहे.