धुळे : रोजगार व नोकरीसाठी बाहेरगावी किंवा अन्य राज्यात स्थलांतरित कुटुंबियांना त्यांचे हक्काचे रेशन मिळावे, यासाठी राज्यात ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात यासाठी ४ लाख ४० हजार ६०७ रेशनकार्ड धारकांची माहिती घेतली जात आहे.
जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०७ एवढ्या शिधापत्रिका आहेत. त्यात अंत्योदयचे लाभार्थी ७६ हजार ९७६, प्राधान्य कुटुंब लाभार्थींची संख्या २ लाख १६ हजार २९५, तर केसरी शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख २९ हजार ८५९ एवढी आहे. त्यातील आधार लिंक नसलेल्या रेशनकार्डधारकांची माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठीच्या विशेष मोहिमेला गती देण्यासह शिधापत्रिका तातडीने वितरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. या अनुषंगाने घेतलेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी यादव, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, धुळे तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, तहसीलदार आशा गांगुर्डे आदी उपस्थित होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची दरमहा बैठक आयोजित करून त्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या आणि शासनाने विहीत केलेले परिमाण या बाबींचा विचार करून जीवनावश्यक वस्तूंची मागणी, पुरवठा, आवश्यकता आणि नियतन या बाबींचा आढावा घ्यावा, ग्रामस्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचना देऊन त्याचा अहवाल मागवावा तसेच स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून वितरीत होणारे धान्य ई-पॉस मशीनच्या माध्यमातून वितरीत करावे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा पात्र लाभार्थी कुटुंबांना लाभ मिळवून द्यावा, जिल्ह्यातील गोदामांची डागडुजी करून घेण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.