मध्यप्रदेशला जाणारी बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST2021-03-22T04:32:39+5:302021-03-22T04:32:39+5:30

दरम्यान, गेल्या एक - दीड महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झालेला आहे. रोज हजारो रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भीतीचे ...

Bus service to Madhya Pradesh closed | मध्यप्रदेशला जाणारी बससेवा बंद

मध्यप्रदेशला जाणारी बससेवा बंद

दरम्यान, गेल्या एक - दीड महिन्यापासून महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झालेला आहे. रोज हजारो रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. सध्या रेल्वेची सेवा पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे प्रवासी बसने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.

धुळ्यातून मध्यप्रदेशातील इंदूर, खंडवा या ठिकाणी जाण्यासाठी बससेवेशिवाय पर्याय नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्यप्रदेशसह महाराष्ट्राच्या बसेसही दोन्ही राज्यात येत- जात असतात.

बसमध्ये प्रचंड गर्दी असते. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरच्या परिवहन आयुक्तांनी १८ मार्च २०२१ रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढले असून, त्यात कोरोनाचे वाढते संक्रमण थांबविण्यासाठी महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्या बसेसला २१ ते ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद केलेले आहे. धुळ्याहून इंदूरसाठी दोन, तसेच नाशिक, श्रीरामपूर, पुणे येथून इंदूरसाठी प्रत्येकी एक बस जात असते. त्याचबरोबर मध्यप्रदेशातून शिर्डी, पुणे, नाशिकसह धुळ्यासाठी एकूण ४५ बसगाड्या येत असतात. या सर्व गाड्या तूर्त बंद करण्यात आल्याचे धुळे आगारातून सांगण्यात आले आहे.

गुजरातबाबतचा निर्णय अद्याप नाही

दरम्यान, मध्यप्रदेशात जाणारी बससेवा तूर्त बंद झालेली असली तरी जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सुरत, अहमदाबाद, वापी, उधना आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस नियमित सुरू आहेत. महाराष्ट्रातील बसेस गुजरातमध्ये, तर गुजरातमधील बसेस महाराष्ट्रात येत आहेत.

रेल्वे नसल्याने प्रवाशांचे हाल

धुळे, शिरपूर, साक्री याठिकाणांहून रेल्वेची सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांना बसशिवाय पर्याय नसतो. येथून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. बससेवा एकदम बंद न करता, काही निर्बंध लावत ती सुरू ठेवायला पाहिजे होती, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: Bus service to Madhya Pradesh closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.