बसची दुचाकीला धडक, दाेन जण ठार

By देवेंद्र पाठक | Updated: June 11, 2023 20:09 IST2023-06-11T20:09:03+5:302023-06-11T20:09:18+5:30

शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना

Bus collides with two-wheeler, two killed | बसची दुचाकीला धडक, दाेन जण ठार

बसची दुचाकीला धडक, दाेन जण ठार

धुळे : गुजरात राज्य परिवहन बसने दुचाकीला धडक दिली. ही घटना शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळ शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात पहाटे अपघाताची नोंद करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील तरडी येथील रहिवासी भागवत कालिदास पाटील (वय ४५) आणि विलास मंगल पाटील (वय ४०) हे दोघे शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेदरम्यान एमएच १८ बीएफ १८८७ ने शिरपूर तालुक्यातील बभळाजकडून तरडी गावाकडे जात होते.

बभळाज ते तरडी गावादरम्यान चोपड्याकडून अहमदाबादकडे जाणारी गुजरात राज्य परिवहनची जीजे १८ झेड ८१३३ क्रमांकाच्या बसने मोटारसायकलला धडक दिली. त्यात या दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दाेघांना मृत घोषित केले.

अपघाताच्या या घटनेनंतर रस्त्यावरील दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बभळाज आणि तरडी येथील ग्रामस्थांनी आणि थाळनेर पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. थाळनेर पोलिसांत अपघाताची नोंद पहाटे करण्यात आली. या घटनेमुळे तरडी गावात शोककळा पसरली आहे.

 

 

Web Title: Bus collides with two-wheeler, two killed