अपघातात गंभीर जखमी झाल्याने लग्नाआधीच वाग्दत्त वधूचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:03 IST2019-11-17T17:56:28+5:302019-11-17T23:03:34+5:30
२० रोजी होता विवाह : वाघाडीनजिक घटना, जुने भामपुरात हळहळ

अपघातात गंभीर जखमी झाल्याने लग्नाआधीच वाग्दत्त वधूचा मृत्यू
शिरपूर/कापडणे : शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावानजिक दोन दुचाकीच्या अपघातानंतर रस्त्यावर फेकली गेलेली वाग्दत्त वधू ट्रकखाली आली़ त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली़ तिला रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू ओढवला़ अपघाताची ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, धुळे तालुक्यातील कापडणे येथील तरुणासोबत तिचा २० नोव्हेंबर रोजी धुळ्यात विवाह होणार होता़ तत्पूर्वीच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे़
शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर येथील शेतकरी मुरलीधर नाना पाटील-बोरसे यांची द्वितीय कन्या वैशाली उर्फ कादंबरी हिचा विवाह २० रोजी कापडणे येथील प्रा़ चेतन उर्फ सचिन मनोहर पाटील-भामरे यांच्याशी धुळ्यातील हिरे मंगल कार्यालयात होणार होता़ तत्पूर्वी १९ रोजी हळद व साखरपुड्याचा कार्यक्रम होणार होता़ त्यासाठी वाग्दत्त वधू वैशाली तिचा लहान भाऊ राकेश मुरलीधर पाटील (२०) व मावशीची मुलगी काजल रविंद्र पाटील (१८) असे तिघे जण एमएच १८ एबी ९९७८ या क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूरकडे साखरपुडा, विवाह सोहळ्यासाठी लागणाºया काही वस्तू घेण्यासाठी निघाले होते़
सकाळी १० वाजेच्या दरम्यान मार्गावरील वाघाडी गावानजिक असलेल्या आऱसी़ पटेल सीबीएसई स्कूलसमोर ओव्हरटेक करुन येणारी जीजे ५ ईक्यू २८७८ या क्रमांकाची दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली़ त्या मुळे राकेश व काजल हे रस्त्यावर बाजूला तर वैशाली ही रस्त्यावर फेकली गेली़ तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली़ त्याचवेळेस भरधाव वेगाने जाणाºया ट्रकच्या खाली ती आल्याने गंभीर जखमी झाली़ तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र मार्गावरच तिचा मृत्यू ओढवला़