कासारेतील एकाला २५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 22:21 IST2020-12-10T22:20:48+5:302020-12-10T22:21:04+5:30
मेडिकल दुकान करार : नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

कासारेतील एकाला २५ लाखांचा गंडा
धुळे : नाशिक येथे मेडिकल दुकान करारात साक्री तालुक्यातील कासारे येथील एकाची २५ लाख रुपयांत फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकच्या एकाविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
साक्री तालुक्यातील कासारे येथील अनिल गोविंदराव चंद्रात्रे (५६) या शेतकऱ्याची सून स्वाती अक्षय चंद्रात्रे यांना मेडिकल सुरू करायचे होते. यासाठी त्यांच्याकडून नाशिक येथील प्रीतेश प्रकाश पारीख याने त्यांच्या बीइंग हेल्दी पॉलिक्लिनिक (५, टाउन स्वेअर अपार्टमेंट, पेठ रोड, पंचवटी, नाशिक) येथे मेडिकल सुरू करण्यासाठी ६० महिन्यांच्या करारावर रोख २५ हजार रुपये आणि आरटीजीएसद्वारे २४ लाख ७५ हजार असे एकूण २५ लाख रुपये घेतले. पॉलिक्लिनिकमधील मेडिकल सहा ते सात महिने सुरू होते. नंतर ते बंद पडल्याने अटी व शर्थींचे उल्लंघन झाल्याचे चंद्रात्रे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी दिलेले २५ लाख रुपये प्रीतेश पारीख याच्याकडे परत मागितले. तेव्हा त्यांनी २५ लाख रुपयांचे धनादेश दिले. परंतु पारीख याच्या खात्यात पैसे नसल्याने ते वटत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने अनिल चंद्रात्रे यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, प्रीतेश पारीख याच्या विरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत.