कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर रक्ताचीही चणचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:53+5:302021-04-02T04:37:53+5:30
धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रक्ताचीही चणचण भासत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात केवळ २१९ रक्ताच्या बॅग शिल्लक आहेत. ...

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर रक्ताचीही चणचण
धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रक्ताचीही चणचण भासत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात केवळ २१९ रक्ताच्या बॅग शिल्लक आहेत. त्यामुळे रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन हिरे महाविद्यालयाचे नोडल अधिकारी तथा रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक शेजवळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दैनंदिन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दररोज सरासरी ४००पेक्षा अधिक रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. रुग्णवाढीचा परिणाम हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या रक्तसंकलनावर झाला असून, रक्तसंकलन घटले आहे.
केवळ २१९ बॅग शिल्लक -
सद्य:स्थितीत हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत केवळ २१९ बॅग शिल्लक आहेत. त्यात, ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या सर्वाधिक ७० बॅग उपलब्ध आहेत, तर एबी निगेटिव्ह रक्तगटाच्या केवळ पाच बॅग उपलब्ध आहेत. ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ४०, ए निगेटिव्ह ८, बी पॉझिटिव्ह ६०, तर बी निगेटिव्ह रक्तगटाच्या १२ बॅग शिल्लक आहेत.
एका महिन्यात लागतात ५०० बॅग -
हिरे वैद्यकीय महाविद्यालयात एका महिन्यात सरासरी ५०० बॅग रक्त लागते. थॅलेसिमियाच्या रुग्णांसाठी अधिक रक्ताची गरज भासत आहे. धुळे जिल्ह्यासोबतच नंदुरबार व जळगाव येथील थॅलेसिमियाचे रुग्ण उपचारासाठी येते येत. मार्च महिन्यात ४१२ बॅग, तर फेब्रुवारी महिन्यात ५१२ बॅग रक्त वापरण्यात आले आहे.
कोरोना लसीकरणानंतर परिणाम -
कोरोना लसीकरणानंतर रक्त संकलनावर परिणाम झाला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. कोरोनाची लस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य कर्मचारी व विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी वेळोवेळी रक्तदानासाठी शिबिर आयोजित करीत असतात. त्यामुळे आवश्यक रक्तसाठा उपलब्ध होत होता. मात्र बहुतांश कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यामुळे रक्तदात्यांची संख्या कमी झाली आहे. रक्तदानासाठी सामाजिक संस्था, युवकांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील तीन महिन्यांपासून हिरे महाविद्यालयातील रक्तसाठा कमी झाला आहे. थॅलेसिमियाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज भासत आहे. सध्या अतिशय अल्प बॅग उपलब्ध आहेत. रक्तदानासाठी सामाजिक संस्था व युवकांनी पुढे यावे. रक्तदान शिबिर आयोजित करायचे असेल तर त्यासाठी संपर्क साधावा.
- डॉ. दीपक शेजवळ, रक्तपेढी प्रमुख हिरे वैद्यकीय महाविद्यालय