जिल्ह्यात काेरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असली तर सोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही तेवढेच चांगले आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र अन्य जिल्ह्यांप्रमाणेच धुळे जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच असल्याचे शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
कोरोना महामारीत कोविड रुग्ण वाचावा यासाठी डाॅक्टरांपासून नातेवाईक सर्वच शर्थीचे प्रयत्न करीत असतात. नातेवाईक आपला व्यक्ती वाचावा म्हणून वाटेल ते करण्यास तयार असतो. याचाच फायदा घेत कमी किमतीचे इंजेक्शन लाखोत विकून आपले घर भरणारे काही लोक हे मानवतेला काळिमा फासण्याचे काम करतात. एक इंजेक्शन दीड लाखाला विक्री करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. पोलिसांनी पकडलेले दोन जण रेमडेसिविरचा काळाबाजार करू शकत नाही, तर यात अनेकांचे हात असतील. पोलिसांनी या प्रकरणातील पडद्यामागील लोकांनाही हेरून पकडले पाहिजे. माणसुकीला लाजविणारे कृत्य करून समाजात स्वत:ला प्रतिष्ठित म्हणविणाऱ्या व्हाइट काॅलर लोकांचा पर्दाफाश केलाच पाहिजे. कारण अशा लोकांमुळे समाजात भ्रष्टाचाराची कीड लागली आहे.
याआधी पोलिसांनी रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक केली होती. मात्र नंतर त्याचा तपास तिथेच थांबला, कारण पुढे काय झाले हे समजलेच नाही. यंदाही तसे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.
लसीकरणाची ऑनलाइन नोंदणीचा घोळ -
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु पहिल्या दिवसापासूनच ग्रामीण भागात ऑनलाइन नोंदणीमुळे शहरी आणि स्थानिक ग्रामस्थ असा वाद निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या लोकांनाच लस दिली जात आहे. नोंदणी ही ग्रामीणपेक्षा शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर आलेल्या लसींपैकी जास्त लस या नोंदणी करून बाहेरून आलेल्या लोकांनाच मिळत आहे, तर दुसरीकडे लसीकरणासाठी पहाटेपासून रांग लावून उभ्या असलेल्या स्थानिक लोकांना मात्र रिकाम्या हाती घरी परत जावे लागत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये संताप दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी धुळे तालुक्यात ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर यावरून वाद निर्माण झाला होता. शेवटी काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात लसीकरणाचे काम सुरू करावे लागले. धुळे तालुक्यात निर्माण झालेला स्थानिक व बाहेरचे हा वाद हळूहळू जिल्हाभरात अन्य तालुक्यातही जाणवू लागला. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वच ठिकाणांहून याला विरोध होत आहे.
ऑनलाइन नोंदणी -
लसीकरण ऑनलाइन नोंदणीसाठी दिलेल्या वेबसाइट आधी तर ग्रामीण भागात नेट प्राब्लेमुळे उघडत नाही. उघडली तर अवघ्या काही मिनिटातच नोंदणी पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना नोंदणीची संधीच मिळत नाही. त्यामुळे जेव्हा लसीकरण केंद्र उघडते तेव्हा नोंदणी करून बाहेरून आलेल्या लोकांची संख्या जास्त दिसते. ग्रामीण भागातील काही लोकांना तर लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते हेच माहीत नाही. त्यामुळे हा वाद वाढतच आहे.
राज्यभरातील लोक धुळ्यात -
ऑनलाइन नाेंदणी ही राज्यभरातून होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऑनलाइन नोंदणीचे प्रमाण कमी असल्यामुळे जेव्हा नोंदणीची वेबसाइट ओपन होते तेव्हा ग्रामीण भागात त्यांचा नंबर लगेच लागतो. अशा पद्धतीने नंबर लागलेल्या राज्यभरातील तरुण हे धुळ्यात येत आहेत. साक्री तालुक्यातील निजामपूर लसीकरण केंद्रावर ३०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. लसीकरण केंद्र सुरू झाले. ३०० पैकी २५० लसी या बाहेरून आलेल्या लोकांनाच मिळाल्या. स्थानिक पातळीवर केवळ ५० लसी उपलब्ध झाल्यात. केंद्रावर लस घेण्यासाठी बाहेरुन अमरावती, जळगाव, पुणे येथील लोकांनी येथे येऊन लस घेतली. हीच परिस्थिती जिल्ह्यात अन्य लसीकरण केंद्रावर आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुण आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रश्नावर जर लवकर तोडगा निघाला नाही तर याचा उद्रेकही होऊ शकतो, अशी भीती आहे.
ग्रामीण भागातील स्थानिक लोकांनाही लस मिळाली पाहिजे. यासाठी ऑनलाइन नोंदणीसोबतच ऑफलाइन लसीकरण करण्यावर जिल्हा प्रशासनाने विचार करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.