भाजपला मित्रांचे मन वळवावे लागेल; काँग्रेसचा 'स्वबळ'चा नारा, तर ठाकरे सेना-मनसे युतीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:37 IST2025-12-20T10:34:47+5:302025-12-20T10:37:10+5:30
वर्चस्वाची लढाई : भाजपचा ५५ प्लसचा नारा; महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा, उद्धवसेना, मनसे युतीचे संकेत, काँग्रेसचा स्वतंत्र लढा

भाजपला मित्रांचे मन वळवावे लागेल; काँग्रेसचा 'स्वबळ'चा नारा, तर ठाकरे सेना-मनसे युतीचे संकेत
चंद्रकांत सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गत महापालिका निवडणूकीत तब्बल १५ वर्षाच्या इतिहासात ७४ पैकी ५२ जागा आपल्याकडे ओढून आणत सत्ता काबीज करण्यात भाजपला यश मिळविता आले. यंदा जागा वाटपावरून महायुतीत ही पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने आधीच स्वबळाचा नारा दिल्याने मविआतही बिघाडी होऊ शकते.
गेल्या निवडणूकीत राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती होती, परंतू जागा वाटपावरून धुळे महापालिकेची युती फिस्कटल्याने भाजपासह अन्य पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविली होती. त्यात भाजपने ७४ पैकी ५२ जागा मिळविल्या होत्या तर शिवसेनेला केवळ एकच जागेवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीतही भाजपाने ७४ पैकी दोघा मित्रपक्षाला १९ जागा देण्याचे कबुल केले आहे. परंतु, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट १९ जागा मान्य करणार नाही. त्यामुळे महायुती होईल, असे वाटत नाही.
मविआतही काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला. पण मनसे आणि उद्धवसेनेत युती होण्याची शक्यता आहे. एमआयएम सुद्धा स्वतंत्र पणे लढणार आहे.
एकूण प्रभाग किती आहेत? - १९
एकूण सदस्य संख्या किती? - ७४
कोणते मुद्दे निर्णायक?
१. मागील निवडणुकीत भाजपने दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाच-सहा वर्षे उलटूनही शहराच्या अनेक भागांत ४ ते ८ दिवसांआड पाणी येते.
२. कचरा संकलनासाठी खासगी ठेका देऊन ही शहरात आजही चौकाचौकात कचऱ्याचे ढीग दिसतात. नियोजनाचा अभावामुळे कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.
३. भूमिगत गटार योजनेचे काम सहा वर्षापासून सुरू आहे. अद्यापही ते काम पूर्ण झालेले नाही.
आधी कुणाची होती सत्ता?
भाजप - ५०
राष्ट्रवादी - ०८
काँग्रेस - ०६
एमआयएम - ०४
समाजवादी - ०२
बसपा - ०१
शिवसेना - ०१
लोकसंग्राम - ०१
अपक्ष - ०१
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - २६९५२८
पुरुष - १,४०,१५५
महिला - १,२९,३७३
इतर - २५
आता एकूण किती मतदार ?
एकूण - ४,३०,३८७
पुरुष - २,२१,७६५
महिला - २,०८,५८०
इतर - ४२
वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला होणार? : वाढीव मतदारांचा फायदा महायुतीला होऊ शकतो.