भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील नवे भदाणे फाट्यावरील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: March 2, 2023 16:31 IST2023-03-02T16:30:47+5:302023-03-02T16:31:26+5:30
धुळे - भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वार मुकेश गाडीलोहार (२९) हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, धुळे तालुक्यातील नवे भदाणे फाट्यावरील घटना
धुळे - भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीस्वार मुकेश गाडीलोहार (२९) हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. गुरुवारी पहाटे धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.
गुजरात राज्यातील बारडोली येथील मुकेश आधार गाडीलोहार (२९) हा जीजे १९ बीएफ ५६८१ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरून धुळ्याच्या दिशेने येत होता. धुळे तालुक्यातील नवे भदाणे गावाजवळ भटाई देवी मंदिराच्या फाट्याच्या अगोदर रोडवर असलेल्या गतिरोधकावर एमएच १८ बीए ०३६८ क्रमांकाच्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. अपघाताची ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. यात मुकेश हा रस्त्यावर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताला जबाबदार असणारा ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला. जखमी अवस्थेत मुकेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दगडू छगन मिस्तरी (वय ४२, रा. पिंपळे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी अपघाताची नोंद करण्यात आली. फरार ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.