सायकलची विक्री ३० टक्क्यांनी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:37+5:302021-07-07T04:44:37+5:30
धुळे : पेट्रोलच्या दराने शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने मोटारसायकल वापरणे परवडत नसल्याने अनेकांनी सायकलचा वापर ...

सायकलची विक्री ३० टक्क्यांनी वाढली
धुळे : पेट्रोलच्या दराने शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने मोटारसायकल वापरणे परवडत नसल्याने अनेकांनी सायकलचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सायकलच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मिळाली.
पेट्रोलचे दर १०६ रुपये प्रती लीटर इतके महागले आहेत. तसेच डिझेलचे भावही वाढल्याने इतर वस्तूही महागल्या आहेत. वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आता मोटारसायकल वापरणेदेखील परवडेनासे झाले आहे. त्यामुळे लहानसहान कामांसाठी मोटारसायकलचा वापर करणारे नागरिक आता मोटारसायकल टाळू लागले आहेत. त्याऐवजी सायकल वापरायला अनेकांनी सुरुवात केली आहे. मागील दोन महिन्यांपासून सायकलच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती शहरातील सायकल विक्रेत्यांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. कोरोना काळापूर्वी सायकल घेणाऱ्यांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असायचे. मात्र शाळा बंद असल्याने सायकलच्या विक्रीत घट झाली होती. मात्र इंधनाचे दर वाढल्याने मागील दोन महिन्यांपासून सायकल विक्रीत वाढ झाल्याने विक्रेत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. तसेच आता सायकल विकत घेणाऱ्यांमध्ये शाळकरी मुलांपेक्षा नोकरदार व व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. तसेच व्यायाम करण्यासाठी सायकल विकत घेणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे.
ई-सायकलला मागणी
धुळे शहरातील सायकल विक्रेत्यांकडे ई-सायकल विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत ई-सायकलची किंमत आहे. तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही सायकल ३५ किलोमीटर चालते. चार्जिंग संपल्यानंतर पायडलचा उपयोगही करता येतो.
मागील दोन महिन्यांपासून सायकलच्या विक्रीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. आज गियरच्या सायकलला अधिक मागणी आहे. ई-सायकल विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
- पराग पाटील, सायकल व्यावसायिक
पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सायकल वापरायला सुरुवात केली आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तत्काळ पेट्रोल व डिझेलचे भाव कमी केले पाहिजेत.
- हर्षल खैरनार, जुनवणे