सावधान... डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:39 IST2021-09-25T04:39:12+5:302021-09-25T04:39:12+5:30
धुळे- कोरोनाप्रमाणेच डेंग्यूच्या व्हायरस बदलत असल्याने चिंता वाढली आहे. केवळ अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असतांनाही डेंग्यूचे अहवाल पॉझिटिव्ह येत ...

सावधान... डेंग्यूचाही व्हायरस बदलतोय !
धुळे- कोरोनाप्रमाणेच डेंग्यूच्या व्हायरस बदलत असल्याने चिंता वाढली आहे. केवळ अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे असतांनाही डेंग्यूचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. तसेच संशयीत रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासकीय रूग्णालयात इलायझा तर खाजगी रूग्णालयात कार्ड ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार केले जात असल्याने चाचण्यांचा गाेंधळ कायम आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे ११० रूग्ण आढळले आहेत. त्यात धुळे शहरात आढळलेल्या ६३ व ग्रामीण भागातील ४७ रूग्णांचा समावेश आहे. त्यातच डेंग्यूचा व्हायरस बदलत असल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात 'डेन व्ही २' या डेंग्यूच्या व्हायरसचे रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळाली. तसेच काही रुग्णांना ताप नसतानाही त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा तसेच परिसरात पाणी साचू देऊ नये अशा सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
हे बदल काळजी वाढविणारे
ताप नसतानाही पॉझिटिव्ह
अंगावर लाल पुरळ उठणे, डोकेदुखी, अंगदुखी ताप अशी डेंग्यूची लक्षणे असतात. मात्र ताप नसतानाही काही रुग्णांची डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे असली तरी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्लेटलेट्स कमी नाही, तरी पॉझिटिव्ह
सर्वसाधारणपणे, प्लेटलेट्स कमी होण्याचे प्रमाण डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसते. मात्र धुळे शहरात आढळलेल्या अनेक रुग्णांना असा त्रास झालेला नाही मात्र पूर्ण उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पॅथॉलॉजिस्ट म्हणतात
डेंग्यूच्या व्हयरसमध्ये बदल होत आहेत. डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये 'डेन व्ही २' हा बदल झालेला व्हायरस दिसून आलेला आहे. हा व्हायरस नेहमी आढळत नाही.
डॉ. राहुल वाडिले, पॅथॉलॉजिस्ट
इलायझा चाचणी करावी
एखाद्या रुग्णाला डेंग्यू आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी इलायझा ही चाचणी ग्राह्य धरली जाते. तसेच उपचारांची दिशा ठरवणे सोपे जाते. डेंग्यू निर्मूलनासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा.
डॉ. विशाल पाटील
जिल्ह्यातील डेंग्यूचे रुग्ण
जानेवारी ते ऑगस्ट २०२१ - ७९
१ ते २२ सप्टेंबर - ३१
गुरुवारी तपासणीसाठी पाठवलेले नमुने - २७