मनोरूग्णाला बस वाहकाकडून अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:52 IST2019-05-16T11:51:18+5:302019-05-16T11:52:31+5:30
नंदुरबार-दोंडाईचा दरम्यानचा प्रकार : मनोरूग्णाने वकीलामार्फत धुळे विभाग नियंत्रकांकडे केली तक्रार

मनोरूग्णाला बस वाहकाकडून अपमानास्पद वागणूक
आॅनलाइन लोकमत
धुळे : दिव्यांग व्यक्तीला व त्याच्यासोबत असलेल्या मदतनीसाला बस प्रवास सवलत असतांनाही वाहकाने मनोरूग्ण व त्याचा साथीदार यास प्रवास सवलत नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार घडला आहे.
दोंडाईचा येथील एक तरूण स्कीझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याच्याकडे शासकीय रूग्णालयातील ५५ टक्के वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. त्याला औषोधोपचारासाठी धुळे तसेच आयुर्वेदीक गोळ्या घेण्यासाठी नंदुरबारला जावे लागते. अंध अपंग व्यक्तीस ७५ टक्के व मदतनीसाला ५० टक्के सवलत महामंडळातर्फे देण्यात येते. हे दोन्ही सवलतीचे कार्ड त्यांच्याजवळ होते.
६ मे रोजी तो मनोरूग्ण तरूण व त्याचा मदतनीस हे सायंकाळी नंदुरबार-धुळे बसमध्ये (क्र. एमएच ४०- एन ९०७९) बसले. बस शहरापासून पाच-सहा किलोमीटरवर आली असतांना वाहक रत्नाकर बागूल यांनी मनोरूग्ण प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागितले. त्यांनी अंध अपंग व्यक्तीचे ओळखपत्र दाखविले.मात्र केवळ ५५ टक्के असा उल्लेख असल्याने बस वाहकाने त्या रूग्णाच्या साथीदारास ५० टक्के सवलत देण्यास नकार दिला. रूग्णाने त्याच्याजवळील ओळखपत्र, वैद्यकीय कागदपत्र दाखवूनही वाहकाने अरेरावी करून बसखाली उतरून जा असे सांगितले. त्यावेळी इतर प्रवाशांचा खोळंबा नको म्हणून मनोरूग्णाने ७५ टक्के प्रमाणे तिकीटाचे १० रूपये व मदतनीसाचे ४५ रूपये असे ५५ रूपये देवून तिकीट घेतले.
दरम्यान वाहकाने मनोरूग्णास नियमानुसार मिळणारी बस प्रवास सवलत नाकारून इतर प्रवाशांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. या संदर्भात त्याने अॅड. विनोद बोरसे यांच्या मार्फत धुळे विभागाच्या विभागनियंत्रकांकडे तक्रार केली आहे. त्यात बस वाहकाची योग्य चौकशी करून तक्रारदार मनोरूग्णास न्याय देण्याची मागणी आहे. अर्जावर तक्रारदार व अॅड. बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकशीचे आदेश
वाहकाने मनोरूग्णास अपमानास्पद वागणूक दिल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या प्रकरणाची विभागीय वाहतूक अधिकारी चौकशी करणार आहेत. संबंधितांचे जाबजबाब घेऊन, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी सांगितले.