फरार सत्तार पिंजारीचा बॅनर झळकताच गुन्हा दाखल, धुळ्यातील वडजाई रोडवरील घटना
By देवेंद्र पाठक | Updated: March 2, 2023 16:28 IST2023-03-02T16:28:10+5:302023-03-02T16:28:57+5:30
धुळे - विविध गुन्ह्यांत फरार असलेला संशयित सत्तार मासूम पिंजारी याचा फोटो असलेला बॅनर झळकताच पोलिसांनी बॅनर जप्त केला. ...

फरार सत्तार पिंजारीचा बॅनर झळकताच गुन्हा दाखल, धुळ्यातील वडजाई रोडवरील घटना
धुळे - विविध गुन्ह्यांत फरार असलेला संशयित सत्तार मासूम पिंजारी याचा फोटो असलेला बॅनर झळकताच पोलिसांनी बॅनर जप्त केला. ही घटना वडजाई रोड भागात बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांतील फरार असलेला सत्तार मासुम पिंजारी याच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर तो आजही फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. फरार असल्याचे माहीत असतानासुद्धा शहरातील एकता सर्कल नरेंद्र चौक, लोकमान्य हॉस्पिटल चौक, वडजाई रोडवरील स्लाटर हाऊसजवळ बॅनर लावण्यात आले होते. त्याच्यावर समाजात दहशत कायम राहावी या हेतूने बॅनर लावलेले आढळून आले. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून समोर आले.
हा प्रकार बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास लक्षात आला. पोलिसांनी लागलीच झळकणारे बॅनर जप्त केले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी डी. आर. तायडे यांनी चाळीसगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने रात्री ८ वाजता ५ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस कर्मचारी ए. व्ही. वाघ घटनेचा तपास करत आहेत.