परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेराॅक्स, फॅक्स, मोबाइलवर बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:43 IST2021-09-17T04:43:04+5:302021-09-17T04:43:04+5:30
जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत उच्च माध्यमिक (१२ वी) तसेच २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या ...

परीक्षा केंद्रांच्या परिसरात झेराॅक्स, फॅक्स, मोबाइलवर बंदी
जिल्ह्यात १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत उच्च माध्यमिक (१२ वी) तसेच २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत माध्यमिक शालांत (१० वी) परीक्षा होत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी पेपर राहील, त्या दिवसाकरिता दररोज सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या २०० मीटर अंतरापर्यंतच्या परिसरात झेरॉक्स, फॅक्स मशीन व मोबाइल फोनच्या वापरावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमान्वये मनाई आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात परीक्षार्थीशिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही. कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक दुखापती, इजा होईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरातील झेरॉक्स, फॅक्स मशीन, लॅपटॉप, एसटीडी बुथ, ई-मेल, इंटरनेट सुविधा बंद राहतील. परीक्षार्थींना मोबाइल, पेजर, गणकयंत्र आदींचा वापर या परीक्षा केंद्राच्या परिसरात करता येणार नाही. सदरचा आदेश संबंधितांना व्यक्तिगत स्वरूपात नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेमधील तरतुदीनुसार हा आदेश काढण्यात आल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.